- मराठवाड्याच्या विकासात जालना ड्रायपोर्टचे भरीव योगदान – केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी
- ड्रायपोर्टमुळे उत्पन्न वाढीबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
जालना, दि. १२ (जिमाका): नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज ८५ हजार कोटींहून अधिकच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
जालना जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यातील उत्पादीत शेतीमाल व इतर वस्तुंच्या निर्यातीसाठी जालना येथील ड्रायपोर्ट वरदान ठरणारे असून मराठवाड्याच्या विकासात जालना ड्रायपोर्टचे भरीव योगदान राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
प्रमुख महामार्ग व रेल्वेने जोडल्या गेलेले जालना हे मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण शहर बनले आहे. ड्रायपोर्टच्या सुविधेमुळे तर शेतकऱ्यांच्या मालासोबतच इतर वस्तूंची निर्यात वाढणार असल्याने उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच रोजगाराची संधी निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी आणि राष्ट्राला लोकार्पण करण्यात आले. जालना शहराजवळील दिनेगाव येथे “गती शक्ती कार्गो टर्मिनल”चेही (ड्रायपोर्ट) दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यानिमित्ताने दिनेगाव येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जून खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, रेल्वेच्या डीआरएम नीती सरकार, जेएनपीटीचे चेअरमन उमेश काळे, नॅशनल हायवेचे अधिकारी प्रकाश गौर आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, 2024 या वर्षात सुमारे 11 लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून विजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, संपूर्ण जगामध्ये आपला माल आयात-निर्यात करण्यासाठीच्या जेएनपीटी बंदरावर ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा ड्रायपोर्टमुळे जालन्यात मिळणार आहेत. ड्रायपोर्टमुळे येथे रोजगार निर्माण होवून येथील तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी कापसाच्या गाठी आणि सूत जालना येथून नागपूर येथे येवून ते हल्दीया कोलकता मार्गे बांग्लादेशामध्ये जाईल. यामुळे लॉजिस्टिक किंमत कमी होवून आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यासह नागपुरातील फळ-पिके तसेच उद्योगातील पक्का माल देश व विदेशात सर्वत्र जाईल आणि जालना शहर जगाच्या पटलावर येईल, असेही त्यांनी सांगितले. पंधरा वर्षापेक्षा जास्त चाललेली वाहने स्क्रॅप करण्याचा कायदा भारत सरकारने संमत केला आहे. त्यामुळे ॲल्युमिनीयम, कॉपर, रबर, प्लॅस्टिक, स्टील हे रिसायकलींग होणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे कामही सुरु करण्यात येणार असून पुढे हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे, त्यामुळे जालना शहराला याचा फायदा होणार आहे. निर्यातीमुळे या भागाचा औद्योगिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ड्रायपोर्टमुळे जालना शहराच्या विकासात भर पडणार असून याच परिसरात इंडस्ट्रीयल झोन तयार झाल्यास रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, जालना शहराच्या विकासात आजचा दिवस महत्त्वाचा असून सुवर्ण अक्षरात कोरावा असा आहे. जालना येथे जमीन मिळत असल्यास या ठिकाणी ड्रायपोर्ट करु असा, विश्वास 2014 साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला होता. याबाबत मीवेळोवेळी पाठपुरावा केला आणि प्रत्यक्षात ड्रायपोर्ट येथे साकार झाले. ड्रायपोर्टमुळे पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेतच परंतु, येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतील. कुठलाही प्रदेश, शहराचा विकास करावयाचा असेल तर दळणवळणाची साधने वाढणे गरजेचे असते. मराठवाड्यातील जालना शहराला मोठ्या प्रमाणात रस्ते व रेल्वेने जोडणी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेचे नवीन मार्ग व प्रलंबित कामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात हजारो पटीने वाढही करण्यात आली आहे. सोलापूर ते धाराशिव, वर्धा- नागपूर- नांदेड, पाचोरा-जामनेर या नवीन मार्गाला मंजूरी दिली असून मनमाड ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या रेल्वेमार्ग दुहेरीकरणाला मंजूरी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर ते मुखेडपर्यंच्या दुहेरी रेल्वे मार्गाचे काम केले जाणार आहे. मनमाड ते नांदेड या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाला गती देवून सध्या परभणी जंक्शनपर्यंत काम पूर्ण झालेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ड्रायपोर्टच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक श्रीमती सरकार यांनी केले. यावेळी मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कबाबत कॉन्कर कंपनीच्या अधिकाऱ्यांना एलओए पत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उद्योजक, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
०००