• Sat. Sep 21st, 2024
किती दिवस अपमान सहन करू? एकनिष्ठतेचा कडेलोट झाला, मनसे सोडताना तात्यांच्या डोळ्यात पाणी

पुणे : माझी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. परंतु पक्षातीलच काही जणांनी माझ्याविरोधात चुकीचे अहवाल पक्षनेतृत्वाकडे दिले. पुणे शहरात पक्षाला पूरक वातावरण नाही. आपण इथून लोकसभा निवडणूक लढवायला नको, असा अहवाल काही जणांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांना दिला. जर निवडणूकच लढवणार नसू तर पक्ष वाढणार कसा? आपण लोकांपर्यंत पोहोचणार कसे? असे सवाल विचारत जर पक्षाला शहरात अनुकूल वातावरण नाही तर महापालिकेत विरोधी पक्षनेते कसा होतो? सातत्याने माझ्या एकनिष्ठतेवर संशय घेतला जात होता. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो. मला दुय्यम वागणूक वागणूक दिली जाते. सरतेशेवटी माझ्या निष्ठेचा कडेलोट झाला आणि मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असे वसंत मोरे यांनी सांगितले. मागील अठरा वर्षातील पक्षातील दिवस आठवताना आणि आपल्यावर झालेला अन्याय सांगताना त्यांचा कंठ दाटून आलेला होता, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. डोळ्यातील अश्रू पुसतच त्यांनी आपली भूमिका मांडली.मनसेसोबत गेल्या १८ वर्षांपासून एकनिष्ठ असलेले पुण्यातील डॅशिंग नेते, माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ ठोकला आहे. पक्षातील अंतर्गत कुरबुरीमुळे त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. त्यांच्या राजीनाम्याने पुणे मनसेला तगडा झटका बसलेला आहे. पुणे मनसे म्हटलं की चटकन वसंत मोरे यांचं नाव यायचं. परंतु मोठं नाव असलेला चेहरा मनसेने वसंत तात्यांच्या रुपाने गमाविल्याचा भावना पुणेकर व्यक्त करत आहे.

मी वारंवार सांगतो होतो की लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. परंतु पक्षातीलच काही लोकांनी मला विरोध केला. माझ्याविरोधात पक्षनेतृत्वाकडे अहवाल दिले. मी कुणाचं नाव घेणार नाही पण त्यांनी सातत्याने माझ्याविरोधात राजकारण केलं. काही लोक स्वकेंद्रीत राजकारण करतात, मी तसं कधीच करत नाही. मी आता परतीचे दोर कापले आहेत. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील. जर त्यांनी खासदारकी लढवायला सांगितली तर लढेन, त्यांनी नाही कौल दिला तर पुढच्या काही दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी सांगितले..

“दु:ख एवढ्या गोष्टीचं वाटतं की सोबत काम केलेल्या सहकाऱ्यांनी माझ्याविरोधात राज ठाकरे यांचे कान भरले. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. माझ्या विरोधात सातत्याने षडयंत्र रचलं. मी निवडणूक लढवू नये, पक्षाने मला तिकीट देऊ नये, हे सातत्याने प्रयत्न केले. पक्षात असूनही मला चुकीची वागणूक दिली, हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आलेला होता, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed