• Sun. Nov 10th, 2024

    नागपूर विभागातील १० रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण, आभासी पद्धतीने पंतप्रधानांचा सहभाग

    नागपूर विभागातील १० रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण, आभासी पद्धतीने पंतप्रधानांचा सहभाग

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १० प्रकल्पांचे लोकार्पण आज मंगळवार, १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी विविध स्थानकांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डीआरएम मनीष अग्रवाल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

    नागपूर, पांढुर्णा, पुलगाव, बल्लारशाह, बैतुल या स्थानकांवर ‘वन स्टेशन-वन प्रॉडक्ट’ स्टॉलचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. याशिवाय मुकुटबन येथे गती शक्ती कार्गो टर्मिनल, राजूर येथे नवीन गुड्स शेड, वर्धा-बल्लारशा थर्ड लाइन, इटारसी-नागपूर थर्ड लाइन, या प्रकल्पांचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. रेल्वेच्या विविध ८५ हजार कोटी रुपयांच्या कार्यक्रमाचे लोकार्पणही यावेळी होईल. तसेच दोन नवीन वंदेभारत व चार वंदेभारत गाड्यांचा विस्तार यावेळी करण्यात येईल.

    दपूमरेच्या नागपूर विभागातील १५ स्थानकांवरील १७ स्टॉलवर ‘वन स्टेशन-वन प्रॉडक्ट’ योजनेंतर्गत स्थनिक उत्पादनांची विक्री सुरू करण्यात येत आहे. यात नेताजी सुभाषचंद्र बोस रेल्वेस्थानक इतवारी, गोंदिया, नैनपूर, डोंगरगड, राजनांदगाव, तुमसर रोड, भंडारा रोड, बालाघाट, छिंदवाडा, सौंसर, चांदा फोर्ट, नागभीड, ब्रह्मपुरी, वडसा, वाराशिवनी या स्थानकांचा समावेश आहे.

    स्थानिक उत्पादने राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय व्हावीत, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात स्थानिक कापड, हस्तशिल्प, मातीपासून निर्मित वस्तू, हातमाग, कृषी, बांबू उत्पादने, वनोपज विक्रीला राहतील. या स्टॉलचे डिझाइन अहमदाबाद येथील नॅशलल इन्स्टिट्युट ऑफ डिझाइन या संस्थेने केले आहे.

    भारत स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे स्थानिक स्तरावरील कारागीर, हस्तशिल्पी, लघुउद्योजक यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि या उत्पादनांना वेगळी ओळखही मिळेल, असेही तिवारी यांनी सांगितले.

    नागपूर विभागातील राजनांदगाव- कळमना थर्ड लाइनचे काम (२८८ किमी) ३५४४.२५ कोटी रुपये खर्च करून करण्यात येत आहे. यातील १७० किमीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५८ किमीचे काम वेगाने सुरू आहे. या योजनांमुळे रेल्वे मार्ग अधिक सक्षम होतील व भविष्यात नव्या गाड्या सुरू करता येतील. त्याचप्रमाणे शिलनी, केवलारी, केळजर या स्थानकांवर गुड्स शेडचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यामुळे व्यापाऱ्यांची सुविधा होईल तसेच रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थारक दिलीप सिंह उपस्थित होते.
    पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: दोन नवीन वंदे भारत सुरू होणार, कसा असेल रुट?
    नागभीड स्थानकावर औषध विक्री

    देशभरात १७ राज्यांमधील ५० रेल्वेस्थानकांवर जनऔषधी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नैनपूर आणि नागभीड स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी संबंधितांना या केंद्रांचे कंत्राटही देण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये जेनेरिक औषधे मिळतील. बाजारात नामांकित कंपन्यांच्या त्याच औषधांपेक्षा ही औषधे स्वस्त राहतील, असे डीआरएम नमिता तिवारी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

    अनेक रेल्वेगाड्या लांब पल्ल्याच्या असतात. त्यामुळे दोन-तीन दिवस प्रवाशी सलग प्रवास करीत असतात. त्यात त्यांना औषधांची गरज पडते. ती वेळेवर न मिळल्यास कुठलाही अनुचित प्रसंग उद्भवू शकतो. हे लक्षात घेऊनच हे औषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed