• Sat. Sep 21st, 2024

भेटीगाठी, सभा आणि भाषणं… शरद पवारांच्या पायाला भिंगरी, बारामतीत एकापाठोपाठ एक कार्यक्रम

भेटीगाठी, सभा आणि भाषणं… शरद पवारांच्या पायाला भिंगरी, बारामतीत एकापाठोपाठ एक कार्यक्रम

दीपक पडकर, बारामती : थकलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी… श्रमणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी… सुप्रिया सुळे अनेकदा ही कविता बोलून दाखवतात. पण खरंच हा बाप किती बुलंद कहाणीचा आहे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार त्यांच्या कृतीतून दाखवत आहेत. वय वर्ष ८४…. पण वय वाढलं म्हणून थकायचं नसतं असा सल्ला देणारा आणि वयाच्या चौऱ्याऐंशीतही न थकणारा हा बाप माणूस आहे शरद पवार! आज बारामतीत दुपारपासून न थकता शरद पवारांनी चार मेळावे घेतले.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांना भेटत आहेत. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत. विविध समाजाच्या मान्यवर मंडळींकडून माहिती घेत आहेत. त्याचबरोबर विविध समाजिक संघटनांना देखील ते मार्गदर्शन करत आहेत. दररोज या कार्यक्रमांमध्ये वाढ होत आहे. विशेषता बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध मेळावे होत आहेत.

बारामतीत वन-टू-वन म्हणजे संबंधितांपर्यंत थेट पोहोचून त्यांना आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी विविध मेळाव्यांच्या माध्यमातून करत आहे. अशात शरद पवारही मागे नाहीत. कालच त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जेष्ठ नागरिकांशी संवाद साधताना वय वाढलं म्हणून थकायचं नसतं, असा सल्ला देत त्यांच्या या धावपळीचं रहस्य आणि गमक विषद केलं.

ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा ठेवा आहेत, तो आपण जपला पाहिजे. शरीर थकेल, पाय दुखतील, गुडघे दुखतील, पण आपला मेंदू जोपर्यंत सशक्त आहे, तोपर्यंत आपण कार्यरत राहिलं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. तो सल्ला प्रत्यक्षात शरद पवार किती अमलात आणतात, याचा प्रत्यय सध्या या विविध मेळाव्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून जाणवत आहे.

रविवारी शरद पवार यांनी संध्याकाळी बारामतीत पोहोचल्यानंतर जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात मार्गदर्शन केले. त्यानंतर लागलीच कुस्तीगीर संघाच्या कार्यालयात जाऊन छोट्या पैलवानांशी संवाद साधला. त्यानंतर आज दुपारी चार वाजता बारामतीत पोहोचलेल्या शरद पवार यांनी होलार समाज मेळाव्याला उपस्थिती लावून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.

या ठिकाणची सभा झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय गाठले. तिथेही ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी बारामती क्लब येथे पोहोचून बारामती, इंदापूर व दौंडमधील वकिलांशी चर्चा केली. तिथेही त्यांनी छोटेखानी भाषण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed