अमरावती, दि. ९ (जिमाका): समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलीस विभाग सक्षमपणे अहोरात्र करीत असतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस विभागाला आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर अनुदानातून अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण)यांच्यासाठी 35 चारचाकी तसेच 15 मोटर सायकल वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनांचा हस्तांतरण सोहळा पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे -पाटील, आमदार रवि राणा, निवेदिता दिघडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अमरावती पोलीस अधीक्षक ( ग्रामीण )विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आली.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीमार्फत पोलीस अधीक्षक अमरावती (ग्रामीण) घटकांकरिता 3 कोटी 4 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानुसार मंजूर निधीतून विभागाच्या सक्षमीकरणासाठी 35 चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले आहेत. ही वाहने कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, स्कॉटिंग, एस्कॉर्ट तसेच पोलीस स्टेशन येथील डायल 112 या कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. तर 15 मोटरसायकल या पोलीस स्टेशन येथील दैनंदिन कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. पोलीस बंदोबस्त तसेच दामिनी पथकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या वाहनांचा निश्चितच फायदा होईल. यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल ,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन विविध उपायोजना राबवित आहेत. पोलिसांच्या सहकार्यामुळेच आपण बिनधास्तपणे समाजात सुरक्षितपणे वावरू शकतो. विविध सण-उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकतो. आपल्याला रात्रीची शांत झोप मिळावी, यासाठी पोलीस विभाग आपले कर्तव्य बजावीत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सायबर सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंमली पदार्थांचा युवकांमधील वापर, वाढती गुन्हेगारी वृत्ती यांना आळा घालण्यासाठी पोलिस विभाग सर्व सुविधांनी सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक साधन सामुग्री, अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक( ग्रामीण) विशाल आनंद यांनी केले. संचालन आणि आभार डॉ. सागर धनोडकर यांनी मानले.
०००