• Sat. Nov 16th, 2024

    नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ByMH LIVE NEWS

    Mar 8, 2024
    नागपूरच्या विकासासह दुर्बल घटकांनाही मुख्य प्रवाहात घेऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर दि. ८: विकास कामात आघाडीवर असलेले महानगर म्हणून नागपुरकडे पाहिले जाते. भविष्यातील सर्व बाबींच्या गरजा लक्षात घेऊन  आपण पायाभूत सुविधांच्या विकासापासून नियोजन केले आहे. विकासाचा  हा टप्पा मेट्रोच्या जाळ्यापर्यंत आपण पुढे आणला आहे. या महानगरात काम करणाऱ्या कष्टकरी, दुर्बल घटकातील लोकांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटीबद्ध आहोत. मनपाच्या जागेवरील भाडेपट्टा पंजीबध्द झालेल्या झोपडीधारकांना पट्टे वाटप करुन आता स्वत:च्या घराचे त्यांचे स्वप्न साकार करुन दाखवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    राजे छत्रपती संभाजी चौक (नागोबा मंदिर चौक) आय.टी. पार्क, मेन रोड येथे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिर लोकार्पण व भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी  केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमदार सर्वश्री प्रविण दटके, विकास ठाकरे, माजी मंत्री श्रीमती सुलेखा कुंभारे, माजी आमदार नाना शामकुले, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व पदाधिकारी उपस्थित होते.

    महानगरात गोरगरीबांना आपल्या घराचे स्वप्न साकार होणे सोपे नसते. शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या जागेची मालकी/पट्टा त्यांच्या नावावर असणे आवश्यक असते. या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने कायद्याच्या चौकटीत हजारो लोकांना पट्टे देऊन आता त्यांचे स्वप्न साकार होण्यास मोलाची मदत केल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेंतर्गत नागपुरात हजारो घरे वंचितांना मिळतील असे उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. ग्रीन सिटी असणाऱ्या नागपूर शहरात डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराऐवजी ई-बसेस सारख्या वाहनांचा सर्वाधिक वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात सुरु असलेल्या इतर बसेस हळूहळू कमी करुन ई-बसेस व अपारंपरिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या बसेसची संख्या वाढवून नागपूर शहराचा देशात नावलौकिक वाढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    महिला दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असून शिक्षणापासून रोजगारापर्यंत, रोजगारापासून आरोग्यापर्यंत शासनाने विचार करुन नियोजन केले आहे. शासनाने नवीन जाहीर केलेल्या महिला धारेणात आता प्रत्येकाला वडीलांसमवेत आपल्या आईचे नावही लिहावे लागेल असे सांगून त्यांनी मातृशक्तीला वंदन केले. मी देखील आता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असे नाव लावणार असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

    नागपूर शहर बदलत आहे. शहराचा चौफेर विकास होत असून, सर्वांगिण विकासासाठी नागपूरला देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जावे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. महानगरातील वाढत्या सुविधा समवेत ड्रेनेज सुविधा वाढव्यात यासाठी आपण विशेष लक्ष देऊन नियोजन केले आहे. प्रत्येक भागाला पुरेसे पाणी मिळेल याकडे आपण लक्ष दिले आहे. येत्या काही दिवसात 24 तास पाणी राहील असे सांगून नाग नदी महानगराच्या सौंदर्याचा एक भाग असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    यावर्षी मागील 25 वर्षातील अतिवृष्टीचा रेकॉर्ड ब्रेक झाला. यामुळे नाग नदीवर असलेले पूल मोठे करावे लागले. लवकरच ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केले जातील. शहराच्या विकासाचा मार्ग चांगल्या रस्त्यातून स्वच्छतेतून, स्वच्छतेतून क्रीडांगणापर्यंत व क्रीडांगणापासून आरोग्यापर्यंत भक्कम होत जात असतो. यासाठीच प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष आपण देत आहोत. रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना स्वतंत्र फुड मॉल विकसीत करुन त्यांना तिथे अधिक चांगल्या सुविधा दिल्या जातील असे ते म्हणाले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले. दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण ५५२ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

    यावेळी सिमेंट रस्ते, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातील वाणिज्य आणि रहिवासी संकुल, गोरेवाडा व प्रतापनगर  जलकुंभ, सार्वजनिक स्मार्ट टॉयलेट, व्हर्टिकल गार्डन  , ई- बसेस, आरोग्य मंदिर, ग्लो गार्डन,, अहिल्याबाई होळकर सभागृह, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिट्यूट, पंडित दीनदयाल उपाध्याय व राष्ट्रमात कस्तुरबा ग्रंथालयांचे  लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. नागपुरातील महिलांसाठी मान्यवरांच्या हस्ते हॅलो यशस्विनी 9545759966 हेल्पलाईनचे लोकार्पण करण्यात आले. महिलांसाठी शिक्षण आरोग्य रोजगार न्याय आणि कायदा याकरिता ही हेल्पलाईन मदत करेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी यांनी मानले.

    ०००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed