• Sat. Sep 21st, 2024

जुलैमध्ये सगळं ठरलेलं, पण आता भाजप…; ‘त्या’ सुत्रावरुन राष्ट्रवादीत खदखद, दादा काय करणार?

जुलैमध्ये सगळं ठरलेलं, पण आता भाजप…; ‘त्या’ सुत्रावरुन राष्ट्रवादीत खदखद, दादा काय करणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राज्यात ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या तयारीत आहे. भाजपनं ३५ उमेदवारांची यादीही तयार केली आहे. मित्रपक्षांना १३ ते १६ जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. अधिक जागा न लढवल्यास राजकीय अस्तित्त्व कसं टिकवणार, असा प्रश्न या पक्षांना पडला आहे.

उमेदवाराची ताकद आणि पक्षाची विजयी होण्याची क्षमता या दोन निकषांवर जागावाटप होणार असल्याचं भाजपच्या एका बड्या नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. शिंदेंना त्यांच्यासोबत असलेल्या खासदारांचे मतदारसंघ हवे आहेत. भाजपला अधिकाधिक जागा हव्या आहेत. पण राष्ट्रवादीकडे खासदारांचं बळ फारसं नसल्यानं जागावाटपाच्या चर्चेत त्यांचा दावा प्रबळ नसल्याचं भाजप नेत्यानं सांगितलं.
जाणीव असू द्या! महाशक्तीनं शिंदेसेनेला स्पष्ट शब्दांत सांगितलं; जागावाटपाचा तिढा सुटणार?
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं राज्यात ४ जागा जिंकल्या होत्या. या चारपैकी केवळ एक खासदार अजित पवारांसोबत आहे. राष्ट्रवादीनं बारामती, शिरुर आणि रायगडच्या जागांवर निवडणूक लढवावी, असा भाजपचा आग्रह आहे. गेल्या निवडणुकीत या तीन जागांसह साताऱ्याची जागा राष्ट्रवादीनं जिंकली होती. पण आता ही जागा लढवण्यास भाजप उत्सुक आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या उदयनराजेंना इथून तिकीट दिलं जाऊ शकतं.

राष्ट्रवादीला परभणी, उस्मानाबादची जागादेखील आहे. दोन्ही मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. इथले विद्यमान खासदार उद्धव ठाकरेंसोबत आजही एकनिष्ठ आहेत. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला होता. आता शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादीनं या जागांवर दावा केला आहे.
पहिल्यांदाच लागोपाठ २ दिवस मंत्रिमंडळ बैठक; मंत्रालयात धावाधाव सुरू, नेमकी कसली लगबग?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ मध्ये फूट पडली. अजित पवारांसह ४० आमदार भाजपसोबत गेले, सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. महायुतीत सहभागी होत असताना भाजपनं लोकसभेच्या ९ आणि विधानसभेच्या ९० जागा देण्याचा शब्द दिला होता. पण आता भाजप शब्द फिरवत असल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed