• Sat. Sep 21st, 2024
देवेंद्र फडणवीस धमकी व्हिडिओ प्रकरण : वांद्रे कोर्टाकडून योगेश सावंतला जामीन मंजूर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जीवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणात २९ फेब्रुवारीपासून अटकेत असलेले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांना वांद्रे महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवले यालाही कोर्टाने जामीन मंजूर केला. दोघांनाही न्यायाधीश अतुल जाधव यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या रोखीच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला. त्यांना महिन्याभरात जामिनाबाबत हमीदार द्यावा लागणार आहे.

सावंत यांनी सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर युवासेनेचे अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी सावंत यांना २९ फेब्रुवारी रोजी अटक केल्यानंतर वांद्रे कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर नवलेला पोलिसांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने २ मार्च रोजी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केल्यानंतर मुंबईतील वांद्रे कोर्टात हजर केले होते. त्यानंतर वांद्रे कोर्टाने नवलेला ७ मार्चपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली होती. तर सावंतची अधिक चौकशी करायची असल्याचे सांगून पोलिसांनी मुंबई सेशन्स कोर्टात पुनर्विलोकन अर्ज केल्याने त्या कोर्टाने सावंतची ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक

मात्र, सेशन्स कोर्टाच्या या आदेशाला सावंत यांनी पत्नीमार्फत तातडीने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. हायकोर्टाने गुरुवारी याप्रश्नी तातडीची सुनावणी घेतल्यानंतर सेशन्स कोर्टाचा आदेश अवैध ठरवून रद्दबातल केला. तसेच सावंत यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत केली. सावंत यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीच दिली नसल्याने नैसर्गिक न्यायतत्त्वाचा भंग झाला आहे, असे निरीक्षण हायकोर्टाने आदेशात नोंदवले होते.

मलाही वेगळी पावलं उचलावी लागतील, वडिलांपोठापाठ योगेश कदमांचे भाजपविरोधात नाराजीचे सूर


त्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सावंत आणि नवले या दोघांच्या जामीन अर्जांवर वांद्रे कोर्टात सुनावणी झाली. सावंत यांची बाजू अॅड. अजिंक्य पोखरकर यांनी तर नवलेची बाजू अॅड. सतीश मानेशिंदे यांनी मांडली. हायकोर्टाने आपल्या आदेशात नोंदवलेली निरीक्षणे आणि दोन्ही आरोपींच्या आणखी कोठडीची आवश्यकता नसल्याचे लक्षात घेऊन वांद्रे कोर्टाने अखेर दोघांनाही जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed