लोणावळा येथे बोलताना मदन बाफना यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा चांगलाच समाचार घेतला. साहेब तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. जे एकेकाळी तुम्हाला दैवत म्हणात होते, ते आज तुम्हाला हुकूमशहा म्हणतात. तुम्ही त्या सगळ्यांना काय दिलं नाही? पण तरीही ते तुम्हाला सोडून गेले. पण साहेब तुम्हाला सोडून गेलेल्यांचे राजकीय करियर जास्त दिवस चालत नाही, असे बाफना म्हणाले.
तुम्हाला पाहून चैतन्य वाटते. आज तुम्ही लोणावळ्यात आला. प्रचाराचा नारळ फुटला. लोणावळ्यात फुटलेला नारळ यश देऊन जातो असा माझा अनुभव आहे. साहेब मी तुमच्यापेक्षा वयानं ६ महिन्यांनी मोठा आहे, असे बाफना म्हणाले. ते ऐकताच शरद पवारांनी त्यांच्याकडे पाहून चटकन हात जोडले. यानंतर सभागृहात खसखस पिकली.
मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे. साहेब मोठ्या माणसांचे ऐकत चला. मी तुम्हाला सांगत होतो त्या प्रफुल पटेलला खासदार करू नका. पण तरीही तुम्ही त्याला खासदार केले. पण त्याने पक्षवाढीसाठी काहीही केले नाही. त्याला खासदार करू नका असे मी आधीच सांगितले होते. पण तुम्ही ऐकले नाही. असो, झाले ते झाले, असे बाफना म्हणाले.
सुनील तटकरे यांच्या घरातील वाद शरद पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन मिटवले होते. तेव्हा शरद पवार साहेब त्यांच्यासाठी दैवत होते. मात्र अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर शरद पवार हे हुकूमशाहीने वागतात, असे आरोप तटकरे करतात. भाजप आमदाराने आयोजित कार्यक्रमात माझे भाषण होते. बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली आहे असे त्यावेळी मी तिथे म्हटले. तेव्हा तो आमदार मला धमकी देऊ लागला. म्हणे आमच्या नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. अरे कोण तुमचा नेता? तुमचा जो नेता आहे त्याला मी लहानपणापासून बघतो आहे आणि आता तुमच्या सोबत आलेला तो तुमचा नेता कधीपासून झाला, असा सवाल बाफना यांनी उपस्थित केला.