• Sat. Sep 21st, 2024

स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ByMH LIVE NEWS

Mar 6, 2024
स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे दि. ६:-आंतरराष्ट्रीय महिला दिन हा फक्त महिलांचा उत्सव म्हणून साजरा न होता तो महिलांना हक्क, न्याय मिळवून देणारा आणि महिला सशक्तीकरणावर भर देणारा असावा. स्त्री-पुरुष या दोघांमध्येही समानतेची भूमिका येणे आवश्यक असून स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र कारागृह विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कारागृह महिला परिषदेचे उद्घाटन व महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी पुस्तिका सन २०२२ चे प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरवडा स्वाती साठे, कारागृह उपअधीक्षक पल्लवी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान काम, समान अधिकार असावेत. घरकामात पुरुष वर्गाचा सहभाग वाढला पाहिजे. यामुळे स्त्रियांना त्यांच्या कामात प्रगती करता येईल. समाजात वावरताना प्रत्येक घटकाबद्दल सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे. यासोबतच मन संतुलीत करण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. यातून एक विशिष्ठ शक्ती निर्माण होत असते.

स्त्री संवेदनशील आहे, पण ती तेवढीच हुशार आणि तल्लखही आहे. प्रत्येक वेळी आपल्यासोबत कोणी असेलच याची वाट न पाहता स्त्रियांनी एकट्याने संकटाला सामोरे जावे. त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी ठेवली पाहिजे.

समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांना शिस्त लावण्याचे काम कारागृह करत आहे. भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे सर्व कायदे केंद्रात मंजूर झाले असून देशभर ते लागू करण्यात येणार आहेत. दिशा कायद्याअंतर्गत सुचविलेल्या तरतुदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. गुप्ता म्हणाले, जीवनात नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. सर्वांना समानतेची वागणूक देणे जी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कारागृह प्रशासनात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढल्याबद्दल श्रीमती साठे यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed