• Thu. Mar 19th, 2026

    आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन या-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2026
    आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन या-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    मुंबई

    ·         आदिवासी विकास मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची राज्यपालांशी चर्चा

    राज्याचे आदिवासी  विकास मंत्री डॉ अशोक वूईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी क्षेत्रातील आमदार तसेच आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोक भवन मुंबई येथे भेट घेऊन आदिवासी विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली. राज्यातील आदिवासी कवी, लेखक, गायक, समाजसेवक व पर्यावरण कार्यकर्त्यांना लोकभवन येथे घेऊन यावे आपण त्यांचेशी चर्चा करू अशी सूचना राज्यपालांनी आदिवासी विकास मंत्र्यांना केली.     

    राज्याला प्रथमच आदिवासी समाजातील राज्यपाल लाभले आहे, त्यामुळे आदिवासी जनतेच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत मिळेल अशी भावना उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. 

    देशाच्या विविध भागातील आदिवासींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे असून अशा सर्व आदिवासी क्रांतिकारकांची माहिती देणाऱ्या लहान लहान पुस्तिका तयार कराव्या अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. 

    राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवन कार्याची माहिती देणारे लघु नाट्य व पथ नाट्य देखील तयार करावे तसेच या कार्यात आदिवासी गायक कलाकार, कवी यांना सहभागी करुन घ्यावे. या उपक्रमामुळे आदिवासींच्या योगदानाबद्दल व संस्कृतीबद्दल नव्या पिढीला अधिक माहिती होईल, असे राज्यपालांनी सांगितले. 

     महिला स्वयंसहायता गट हे महिला सक्षमीकरणाचे आंदोलन आहे असे सांगून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आदिवासी विकास विभागाला राज्यातील आदिवासी विभागांमधील महिला स्वयंसहायता गटांची संख्या व त्यांचे कार्य याबाबत विस्तृत माहिती गोळा करून सादर करण्याची सूचना केली.

           आदिवासी भागांमधील क्षयरोग निर्मूलनाची स्थिती तसेच आदिवासी महिलांमधील ऍनिमिया या विषयाची देखील माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या.

    बैठकीला आमदार हरिश्चंद्र भोये, राजेश पडवी, भीमराव केराम, केवलराम कावे, राजू तोडसाम व माजी मंत्री राजेंद्र गावित उपस्थित होते. 

    यावेळी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड व आदिवासी विकास संशोधन परिषदेच्या आयुक्त मंजिरी मनोलकर यांनी राज्यपालांसमोर आपापल्या विभागांचे सादरीकरण केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed