• Sat. Sep 21st, 2024

सामाजिक न्याय विभागाच्या विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन सोहळा

ByMH LIVE NEWS

Mar 6, 2024
सामाजिक न्याय विभागाच्या विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन सोहळा

मुंबई, दि. 6 : सामाजिक न्याय विभागाच्या विविध उपक्रमांचा तसेच नूतन इमारतींचा उद्घाटन सोहळा उद्या, दिनांक 7 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन या इमारतीचा लोकार्पण सोहळा तसेच ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात येऊन या योजनेच्या पाच लाभार्थ्यांना प्रतिनिधीक औपचारिक धनादेश वाटप करण्यात येणार आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनांच्या डीबीटी पोर्टलचे लोकार्पण  होणार आहे. दिव्यांग विभागाच्या वतीने दिव्यांगांना 667 ई-व्हेइकलचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई विभाग वंदना कोचुरे उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन आहे. ठाणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन या इमारतीमध्ये जिल्हा जात पडताळणी कार्यालय, सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व महामंडळे, सुसज्ज सभागृह, अद्यायावत अभिलेख कक्ष आहे.

राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय नुकताच घेतला असून राज्यातील सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून 480 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठांना मदतीचा आधार मिळणार आहे. या योजनेचाही शुभारंभ या कार्यक्रमात होणार आहे.

राज्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृतीवेतन योजनेचे 45 लाख लाभार्थी असून ऑनलाइन प्रणालीमुळे ज्येष्ठांना अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या बँक खात्यामध्ये आता थेट पैसे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जमा होणार आहेत. सन 2023-24 या अर्थिक वर्षात आज अखेर दोन्ही योजनाच्या लाभार्थ्यांना सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed