• Sat. Sep 21st, 2024

रोजगार देणे पुण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

Mar 6, 2024
रोजगार देणे पुण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणेदि. :- कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळाला की, संपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणे हे पुण्याचे काम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

येथील कोपरी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरी, कुलगुरु अपूर्वा पालकर, बी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाड, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना आदि मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शासनाकडून निर्णय झाला होता की, राज्यातील बेरोजगार युवकांना 75 हजार शासकीय नोकऱ्या देणार, मात्र प्रत्यक्षात एक लाख 60 हजार शासकीय नोकऱ्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. शासनाने शासकीय नोकर भरती बंदी उठविली. कौशल्य विकास विभागाने अतिशय उल्लेखनीय काम करून दाखविले असून या विभागाकडून आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या दिल्या गेल्या असून 1 लाख स्वयंरोजगार  उभे करण्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले की, गरज म्हणून नोकरी तर करायला हवी मात्र नोकऱ्या देणारे हातही घडविले पाहिजे. बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड यांनी पुढच्या दहा वर्षात दहा लाख नोकऱ्या देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आजच लोकार्पण केलेले देशातील पहिले स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल डेव्हलपमेंट केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेतून समाजाच्या स्वस्थतेकडे जाण्याचा मार्ग दाखविला. हाच आदर्श समोर ठेवून या शासनाने देखील डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महानगरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिलेच आहे. त्याच पद्धतीने डीप क्लिन ड्राईव्हचे अभियान सुरु आहे.

विविध सामाजिक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बेरोजगारांची यादी बनवावी व ही यादी अशा संस्थांकडे द्यावी. या बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षणानंतर त्यांना तीस हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अनेकांनी आपले स्वयंरोजगार सुरू केले. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देखील दहा हजार आठशे महिलांना आपण शिलाई मशीन व घरघंटी दिल्या. ही व्यवसायाची सुरुवात आहे, अशा छोट्या छोट्या व्यवसायातून तोच व्यवसाय व्यवस्थित केल्यानंतर भविष्यात ती व्यक्ती एक मोठी व्यावसायिक बनते, असे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,  महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, मी स्वत:ला सीएम पेक्षा कॉमन मॅन समजतो. कार्यकर्ता समजतो. म्हणूनच मला सर्वसामान्यांचे दुःख समजते. सामान्य माणसाचे हे दु:ख समजून घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे सर्वत्र तयार होत आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू यासारखे प्रकल्प हे गेम चेंजर प्रकल्प आहेत. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राज्याचा जास्तीत जास्त विकास करण्याचे आमचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्र, गड किल्ले स्वच्छ ठेवणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत अनेक तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्याचा या शासनाचा प्रयत्न सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारे हे सरकार आहे

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राज्यगीताने झाली. सूत्रसंचलन शिबानी जोशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महत्वपूर्ण करार झाला. कौशल्य विकास आणि रोजगार या विषयात उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाड, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुलगुरु अपूर्वा पालकर यांनी स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. आज वाढती कार्यक्षेत्रे, मॉल्स, रुग्णालये, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्वांना सुविधा स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. सुविधा क्षेत्र विकसित होत असून असून या क्षेत्रात 2024 सालात 3 लाख 50  हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2023 च्या तुलनेत ही वाढ 15 ते 20 टक्के जास्त असेल.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारचे प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. अभ्यासक्रमाची रचना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरज लक्षात घेऊन करण्यात आली असून नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. येथे मॅकेनाईज्ड हाऊसकिपींग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती दिली.

या अकॅडमीची वैशिष्ट्ये

  • सुविधा व्यवस्थापनातील आवश्यक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवण्यासाठी लघु आणि दीर्घ कालावधीचे शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
  • सुविधा क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर.
  • उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सोयी आणि उपकरणांनी सज्ज.
  • भारत विकास ग्रुपचे सर्वांगीण व्यवस्थापनासाठी सहकार्य.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed