शरद पवार हे मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्याशी सातत्याने संवाद साधतायेत. महायुतीत नाराज असलेले महादेव जानकर यांचीही घुसमट होते आहे. हीच नाराजी हेरून शरद पवार यांनी जानकर यांच्याशी संपर्क करून महाविकास आघाडीत येण्याचं आवतान दिलं. त्याचवेळी आपल्या कोट्यातून जानकर यांना माढ्याची जागा सोडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
शरद पवार हे आपल्या कोट्यातून माढ्याची जागा देणार
महादेव जानकर महाविकास आघाडीत येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीच्या कोट्यातून वंचित आघाडीला ३ ते ४ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे महादेव जानकर यांच्या रासपला शरद पवार हे आपल्या पक्षाच्या कोट्यातून माढ्याची जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती आहे. महादेव जानकर हे मागील काही काळापासून भाजपसह महायुतीवर नाराज असल्याचं दिसत आहे. जानकर यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्ये करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्तही केली होती. महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते.
माढा मतदारसंघ नेहमीच चर्चेत
२००९ साली माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभेसाठी आहे. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनच चर्चेत आहे. आतापर्यंतच्या तीन निवडणुकीत राजकीय संघर्षच पाहावयास मिळाला. कारण संपूर्ण मतदारसंघात राज्यातील दिग्गज नेते आहेत. प्रत्येकाचा सवतासुभा आहे. राजकीय पक्षापेक्षा त्यांची स्वतःची व्होट बँक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला. आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे.