जळगाव दि. 4 (जिमाका ) – महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपातकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीटचे’ उदघाटन ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाले.
जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास आ.मंगेश चव्हाण, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी. राऊळ, नायब तहसिलदार रुपाली काळे यांच्यासह विविध विभगाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवत असते अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसते. अशा आपत्तीकाळात राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या टिम मदतीसाठी येत असतात आणि ही आपत्ती जास्त काळ असल्यास राहण्यासाठी तसेच बचाव कार्यातील नागरिकांना तात्काळ उपचाराचासाठी या टेन्टचा उपयोग होणार आहे. जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास अशी सर्व सुविधा असलेले 18 टेन्ट मिळाले असून जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास या टेन्टचा उपयोग होणार आहे. हे टेन्ट पोलीस दल, वन विभाग, महापालिका, नगरपालिकेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टेन्ट बद्दल सर्वांना सविस्तर माहिती दिली.
00000