या परवानगीनंतर मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने पूलाचा आराखडा आणि बांधकामासाठी निविदा काढली आहे. या पुलाची उभारणी तीन वर्षांत करावी लागणार आहे. पूल उभारणी झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे. बोटींच्या मार्गातील अडथळे आणि बांधकामावेळी गाळ साचण्याची शक्यता यामुळे मच्छिमारांनी प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र प्रकल्पाचे महत्त्व सांगितल्यानंतर हा विरोध मावळला. मढ-वर्सोवा पुलाची लांबी ही साधारण दीड किमी आहे. या पुलामुळे अंधेरी, मढ, बोरिवली आणि गोराई भागातील वाहतूक सुधारणार आहे.
पूर्व-पश्चिम जोडणीसाठी उन्नत मार्ग
पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या खार सब वेमध्ये पावसाळा किंवा अन्य वेळी मोठी वाहतूककोंडी होते. यातून सुटका करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने खार सब वे पूर्व-पश्चिम आणि वांद्रे टर्मिनस कनेक्टर पूर्व-पश्चिम जोडणी देण्यासाठी उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याचे तीन टप्प्यांत काम होणार असून त्याच्या बांधकामासाठीही निविदा काढली आहे. साधारण पाच किलोमीटर लांबीचा हा पूल असेल. सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. तीन टप्प्यांत उड्डाणपूल होताना यापैकी पहिल्या टप्प्यात सांताक्रूझ पूर्व नेहरू रोड येथून पुलाची सुरुवात सुरू होऊन खार पश्चिमेला तो संपेल. खार पश्चिमेकडून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील सर्व्हिस रोडपर्यंत जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वांद्रे स्थानक आणि टर्मिनस येथून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडपर्यंत उन्नत मार्गिका बांधली जाणार असून ती सव्वादोन किलोमीटर लांबीची असेल. तर तिसऱ्या टप्प्यात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड येथूनच एअर फोर्सच्या जागेतूनही उन्नत मार्ग जाऊन तो खार सब वेवरील उड्डाणपुलाला जोडला जाईल.
