• Mon. Nov 25th, 2024
    समृद्धी महामार्गाच्या पुलाला दीड वर्षातच भगदाड, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, वाहनचालक धास्तावले

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगावजवळील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. काँक्रिट पडले त्या वेळी काही शेतकरी पुलाखालून जात होते. सुदैवाने त्यापैकी कोणालाही इजा झाली नाही. पुलाचे काँक्रिट पडल्याचे दिसताच त्यांनी ही माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर या खड्ड्याच्या परिसरात बॅरिकेड्स लावून वाहतूक दुसऱ्या मार्गिकेने वळविण्यात आली.

    राज्यातील नागपूर आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत सुरू होऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे. सतत होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गाच्या रचनेवर टीका केली जाते. या मार्गाचे बांधकाम सुरू असताना गर्डर कोसळून काही अपघातही झाले होते. त्या वेळी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. लोहोगावजवळील चॅनेल नंबर १५६ या ठिकाणी पुलावर खड्डा पडल्याने महामार्गासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याबाबत संशय निर्माण झाला आहे.

    ‘अमरावती जिल्ह्यातील पुलावर पडलेला खड्डा म्हणजे ‘समृद्धी’ला पडलेले भ्रष्टाचाराचे भगदाड आहे. १२ तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या महामार्गाचेच १२ वाजले आहेत,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.
    Samruddhi Mahamarg: इगतपुरी ते नागपूर सुसाट, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख ठरली
    ‘दुरुस्तीसाठी चार-पाच दिवस’

    समृद्धी महामार्गांवर मुंबईकडे जाणाऱ्या डावीकडील मार्गावरील पुलावर खड्डा पडल्याने वाहतूक लगतच्या मार्गिकेवरून वळवण्यात आली आहे. क्षतिग्रस्त भागाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ही घटना कशामुळे घडली, याबाबतचा तपास तांत्रिक चमूकडून सुरू आहे. साधारणपणे चार ते पाच दिवसांमध्ये या मार्गिकेवरून वाहतूक पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता जी. ए. पळसकर यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *