• Sat. Sep 21st, 2024
‘एनएचएआय’चा अधिकारी अटकेत, लाच घेताना सीबीआयने पकडले; घरातून ४५ लाख रुपये जप्त

नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना लाच प्रकरणात अटक केली. २० लाख रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आली. लाचखोर अधिकाऱ्याच्या घरातून सीबीआयने ४५ लाख रुपयेही जप्त केले आहे. या कारवाईमुळे एनएचएआय विभागात खळबळ उडाली आहे.अरविंद काळे (वय ५६ वर्षे) असे या प्रकल्प संचालकांचे नाव आहे. त्यांनी एका खासगी कंपनीकडून लाच स्वीकारल्याचे पुढे आले आहे. दोन दिवसांपासून दिल्ली सीबीआयचे पथक नागपुरात सापळा रचून बसलेले होते. रविवारी संधी मिळताच सीबीआयने काळे यांना पकडले. काळे यांच्यावर नागपूर विभागात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी होती. त्यापैकी एक प्रकल्पाचे कंत्राट भोपाळच्या कंत्राटदाराला मिळाले होते. काळे आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्या कंत्राटदाराला लाभ पोहोचवत असल्याची तक्रार दिल्ली सीबीआयला मिळाली होती. या तक्रारीवरून दिल्ली शाखेचे एक पथक नागपुरात पोहोचले.
‘मविआ’त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं? वंचितची काय असणार भूमिका? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

नागपूर शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने काळे यांच्या नरेंद्रनगर येथील घराबाहेर सापळा रचला. रविवारी दुपारी कंत्राटदार काळे यांच्या घरी आला. त्याने काळे यांना २० लाख रुपयांची लाच दिली. त्याच दरम्यान सीबीआयच्या पथकाने धाड टाकली. कंत्राटदाराने दिलेले २० लाख रुपये जप्त करून काळे यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत लाच रकमेसह एकूण ४५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच सोन्याचे काही दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्रही जप्त करण्यात आले.

११ जणांना केले आरोपी

सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी एनएचएआयच्या दोन कार्यालयांसह कंत्राटदाराच्या भोपाळ येथील कार्यालय आणि घराची झडती ही घेतली. या प्रकरणात एकूण ११ जणांना आरोपी करण्यात आले आहे. इतर आरोपींच्या अटकेबाबत सीबीआयकडून गोपनियता पाळण्यात येत आहे. काळे नागपूर येथीलच रहिवासी आहे. व्हीएनआयटीतून त्यांनी सिव्हील इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर हायड्रॉलिक्समध्ये एमटेक ही व्हीएनआयटीतूनच केले. रस्ते आणि उड्डाणपुलांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed