• Mon. Nov 25th, 2024

    हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर…

    हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर…

    बारामती: वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली आहे. त्यांना बरोबर घेण्याची माझीही वैयक्तिक इच्छाआहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील हक्काचा एक मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर बरोबर आले तर त्यांचे स्वागतच आहे,असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

    बारामतीतील गोविंद बाग येथील निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवार यांनी ही इच्छा व्यक्त केली. अनौपचारिक चर्चेत पत्रकारांनी सहज विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला हवे. प्रकाश आंबेडकर यांनी सहा जागा आमच्या निवडून येऊ शकतात, असे मत व्यक्त केल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून देतात पवार म्हणाले की, हो प्रकाश आंबेडकर यांची काही मतदारसंघात चांगली ताकद आहे. त्यामुळेच त्यांना बरोबर घेण्याची आमची इच्छा आहे. त्यांनी २७ जागांच्या ठिकाणी आमची ताकद असल्याचे पत्र महाविकास आघाडीला दिलेले आहे. येत्या सहा व सात मार्च रोजी मुंबईत महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महत्त्वाचे बैठक होत आहे,यामध्ये ही चर्चा होईल.

    दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना बरोबर घेणार आहात का? असा प्रश्न विचारला असता राष्ट्रीय समाज पक्षाने या प्रक्रियेत सोबत असायला हवे माढा लोकसभा मतदारसंघात मी यापूर्वी २००९ ते २०१४ या काळामध्ये लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची आमची इच्छा आहे, असे पवार म्हणाले.

    लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात सध्या विविध माध्यमांमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्याची माहिती येत आहे. मात्र या संदर्भात पवार यांनी यासंदर्भातील महत्त्वाची बैठक मुंबई येथे होणार असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या जागा वाटपाचे सूत्र ठरेल अशी माहिती दिली. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये इतरही पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असून त्या संदर्भातही चर्चा सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. एकूणच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप ठरलेले नसल्याने, यासंदर्भात माध्यमांमध्ये येणारी चर्चा महत्त्वाची नसल्याचेही यातून सूचित होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *