• Sat. Sep 21st, 2024

भाजपच्या बॅनरवरुन शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो फळकला; पण CMचा फोटो टाळला

भाजपच्या बॅनरवरुन शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो फळकला; पण CMचा फोटो टाळला

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले. या घटनेनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष विकोपाला गेला आहे.

आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. विकासकामांची माहिती देणाऱ्या बॅनरवर आमदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जय प्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही फोटो बॅनरवर छापण्यात आला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या एकाही नेत्याला बॅनरवर स्थान देण्यात आलेलं नाही.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात १ कोटी ९५ लाखांची विकासकामं होत आहेत. त्या कामांचा तपशील बॅनरवर देण्यात आला आहे. त्यांचं भूमिपूजन गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांच्या हस्ते होणार आहे. गायकवाड यांच्याकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या बॅनरवर अजित पवारांचा फोटो आहे, पण शिंदेंचा फोटो नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातलं शीतयुद्ध कायम असल्याचं दिसत आहे.

गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे दोन पक्षांमधला संघर्ष आणखी पेटला. यानंतर भाजप नेत्यांची बैठक झाली. शिंदे आणि त्यांच्या गटातील कोणत्याही नेत्याचे फोटो बॅनरवर वापरायचे नाहीत असा निर्णय त्यात घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचं चित्र आहे. याबद्दल भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता, बॅनरवर काय नाही याकडे लक्ष देऊ नका, असं उत्तर त्यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed