मुंबई: वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मविआशी पूर्ण युती झाली नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी हे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा वेळ उरला असताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची अद्याप मविआसोबतच्या युतीच्या चर्चाच सुरु आहेत. जागावाटपासाठी आंबेडकर यांनी मविआसमोर ठेवलेल्या अटींमुळे ही युती अडल्याची चर्चा आहे.वंचित बहुजन आघाडीने २७ जागांवर लढण्याची तयारी केल्याचे पत्र महाविकास आघाडीतल्या नेत्यांना दिले होते. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादंग उठले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीमुळे मविआतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार, तसेच काँग्रेस या तीन पक्षांचे जागावाटपाचे गणित बिघडू शकते त्यामुळे वंचितसोबच्या युतीबाबात मविआने अद्याप कोणती घोषणा केलेली नाही.
मविआच्या प्रमुख नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, युतीबाबत कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने आता प्रकाश आंबेडकर यांनीही व्हिडीओद्वारे वंचित बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. मविआच्या बैठकींना उपस्थित न राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करुन एकप्रकारे मविआला इशारा देण्याचा आंबेडकर यांनी प्रयत्न केला आहे. मात्र, आंबेडकर यांनी थेट व्हिडिओ प्रसारित करत जाहिररित्या वंचित आणि मविआची अद्याप युती झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मविआच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.