• Sat. Sep 21st, 2024

धाडसी कहाणी! भयंकर अपघात, किचकट शस्त्रक्रिया; तरी कोणतीही सवलत न घेता ती दहावीच्या परीक्षेला

धाडसी कहाणी! भयंकर अपघात, किचकट शस्त्रक्रिया; तरी कोणतीही सवलत न घेता ती दहावीच्या परीक्षेला

पुणे : वाई तालुक्यातील पंधरा वर्षीय अंजली (बदललेले नाव) वडिलांच्या रसवंतीगृहात उसाचा रस पिण्यासाठी गेली असताना वाऱ्यामुळे तिचे केस मशिनमध्ये अडकले. थरकाप उडवणाऱ्या या अपघातात अवघ्या काही क्षणांत तिच्या डोक्याचे मांस आणि केस वेगळे होऊन जमिनीवर पडले. हा भयानक प्रकार पाहून अंजलीच्या कुटुंबीयांचे सारे अवसान गळाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अंजलीचे डोक्यापासून वेगळे झालेले मांस शस्त्रक्रिया करून पुन्हा बसविण्यात यश आले. हे उपचार यशस्वी झाल्याने तिला पुन्हा केस येऊ लागले असून, राज्य परीक्षा मंडळाकडून कोणतीही सवलत न घेता तिने शुक्रवारी दहावीचा पहिला पेपर दिला.अंजलीचा अपघात १८ फेब्रुवारीला घडला. घटना घडल्यानंतर दोन-अडीच तासांत तिला दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला पुन्हा केस येण्यासाठी डोक्यापासून वेगळे झालेले मांस पुन्हा रोपण करणे गरजेचे होते. अंजलीला पुण्याला हलविण्याच्या धावपळीत तिचे कुटुंबीय मांस गावीच विसरले. त्यामुळे उपचारांमध्ये विलंब होण्याची शक्यता होती. तिचे नातेवाइक पुन्हा गावी गेले आणि मांस घेऊन परतले. त्या कालावधीत डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची तयारी सुरू करून डोक्यातील बारीक रक्तवाहिन्या शोधून आणि उपचारांचे नियोजन केले. नातेवाइकांनी मांस आणल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू झाली. पाच ते सहा तास शर्थीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया य़शस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले. प्लास्टिक सर्जन डॉ. निखिल आगरखेडकर, डॉ. श्रावणी शेट्ये, भूलतज्ज्ञ डॉ. कल्याणी धर्माधिकारी, डॉ. पल्लवी पै, परिचारिका मोनाली सहारे यांनी ही शस्त्रक्रिया य़शस्वी केली.

संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

शस्त्रक्रियेनंतर अंजलीला पुन्हा केस येऊ लागले आहेत. तिचे केस पूर्ववत मोठे येण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील. ‘तुटलेला अवयव जोडण्याची शस्त्रक्रिया त्वरित सुरू केल्यास ती यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते,’ अशी माहिती डॉ. आगरखेडकर यांनी दिली. या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी ‘बजाज फायनान्स’ने सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून मदत केली.

शस्त्रक्रियेतील आव्हाने

– पुन्हा डोक्याचे मांस बसविणे.

– मांस पुन्हा बसवाताना शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या योग्य पद्धतीने जोडणे

– रक्तवाहिन्या योग्य पद्धतीने न जोडल्यास डोक्याचा भाग काळा होऊन पुन्हा केस आले नसते.

पत्नीची प्रसूती सिझेरियन झाली; पतीने त्यानंतर थेट स्वतःची नसबंदी केली

शरीरापासून वेगळा झालेला अवयव पुन्हा बसविण्याची शस्त्रक्रिया दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केली जाते. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

– डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

सुरुवातीला आम्ही खूप घाबरलो होतो. परीक्षा तोंडावर असताना झालेल्या या अपघातामुळे सर्वांनाच चिंता वाटत होती. ‘दीनानाथ’मधील सर्व डॉक्टरांमुळे माझी मुलगी व्यवस्थित परीक्षा देऊ शकली याचे समाधान आहे.

– मुलीचे वडील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed