अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात कापसाचा पेरा वाढविला. उत्पादनही समाधानकारक झाले. पुढे अधिक दर मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला. अधिक दर मिळाल्यानंतर कापसाची विक्री करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला नाही. फेब्रुवारीत वाढलेले दर पुन्हा कोसळले. महिन्याच्या शेवटच्या दिवशी; २९ फेब्रुवारीला अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांची गर्दी वाढली. गेल्या आठवड्यापासून कापसाच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. सात-साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल असलेल्या कापसाच्या भावात तब्बल हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. हे दर प्रती क्विंटल १५ हजार रुपये प्रती क्विंटल मिळावे, अशी मागणी शेतकरी गजानन गावंडे पाटील यांनी केली आहे. भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी अजूनही कापूस घरात साठवून ठेवला आहे.
नऊ हजारांवर जाणार
कापसाच्या उत्पादनात घट आली आहे. रुईच्या गाठी आणि सरकीच्या दरात वाढ झाली. कापड उद्योगाकडून आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढू लागली आहे. एकूणच ही परिस्थिती समाधानकारक असल्याने कापसाचे दर नऊ हजार रुपये प्रती क्विंटलवर जाणार, अशी शक्यता अकोटचे कापूस व्यापारी किशोर लाखोटिया यांनी व्यक्त केली आहे.