• Sat. Sep 21st, 2024
मराठा समाजावर दडपशाही सुरू, त्यासाठी गृहमंत्रिपद असते का? मनोज जरांगेंचा हल्ला सुरूच

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष असून मराठा आमदार आणि मंत्र्यांकडून त्यांनी दंड थोपटले आहेत. जनतेवर दडपशाही करण्यासाठी गृहमंत्री पद असते का ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि अंतरवाली सराटी येथील संचारबंदी उठवावी, असे जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे रवाना झाले. त्यापूर्वी रुग्णालयात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘सव्वा कोटी लोकांना कुणबी नोंदी सापडल्यामुळे आरक्षण मिळाले आहे. आंदोलनामुळेच दहा टक्के आरक्षण मिळाले. आता सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजवणी करावी. नेत्यांना आणि पक्षाला बोललो म्हणून जातीतल्या तरुणांना मारणार का तुम्ही ? असा सवाल जरांगे यांनी केला.

ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.

ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आमदार आणि मंत्र्यांना खुशाल एकवटू द्या, असे जरांगे म्हणाले. सरकार किती दिवस दडपशाही करते ते बघणार आहे. सरकारने हेतूपूर्वक आरक्षण देण्यास उशीर केला. आता कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलत आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. अंतरवाली सराटी येथील संचारबंदी उठवावी आणि गृहमंत्र्यांनी दडपशाही थांबवावी, असे ते म्हणाले. समर्थकांच्या गर्दीत जरांगे अंतरवालीकडे रवाना झाले. गावात पोहचल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

दरम्यान, भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांची शुक्रवारी रुग्णालयात भेट घेतली. आरक्षणाच्या संदर्भाने सोशल मीडियावर महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर महिलांबाबत अपशब्द बोलणे चुकीचे आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा आमचा कार्यकर्ता असणार नाही. त्यांचे कदापि समर्थन करणार नाही, असे जरांगे म्हणाले. तर महिला कार्यकर्त्यांनी जरांगे यांना संविधानाची प्रत भेट दिली. या कायद्यानुसार बोलण्याचे प्रसिक्षण कार्यकर्त्यांना द्या, असे महिला म्हणाल्या. तर या कायद्यानुसार आरक्षण देण्यास तुमच्या नेत्याला सांगा, असे प्रत्युत्तर जरांगे यांनी दिले.

आंदोलनासाठी आज बैठक

मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. हडको एन-११ येथील मराठा मंदिर येथे सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीस समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed