फडणवीस, पाटीलांविरोधात नाराजी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय दृष्ट्या भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते मानले जातात. ते पुण्या-मुंबई सारख्या शहरांमधील राजकारणात रस ठेवतात; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी दिली असली तरी ते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ताकद देत नाहीत, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे फडणवीस, पाटील यांच्याविरोधात नाराजी आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ला मदत कशी करायची, असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे?
‘विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’ला जागा सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात भाजपचा एक आमदार सोडून इतरत्र ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य आहे. स्थानिक निवडणुकांसह राजकारणात भाजपच्या नेत्यांकडून स्थानिक कार्यकर्त्यांना मदत मिळत नाही. आम्ही कोणत्या आधारावर ‘राष्ट्रवादी’ला मदत करायची,’ असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. राहुल कुल, हर्षवर्धन पाटील हे भाजप म्हणून काम करण्याऐवजी वैयक्तिकरित्या काम करतात. भाजपसाठी ते काही करीत नाही. कार्यकर्त्यांनी कोणाकडे तक्रारी मांडायच्या? कोणाकडे मदत मागायची? पक्ष कसा वाढवायचा? अशी भूमिका जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मांडली.
काम करा, नाही तर घरी बसा
‘ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी लढविली जात आहे. ज्या कार्यकर्त्यांना मोदींना पंतप्रधान करण्यासाठी काम करायचे आहे. त्यांनी काम करावे. ज्यांना काम करायचे नाही, त्यांनी अन्य पक्षात जावे किंवा घरी बसावे,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी तंबी दिल्याने पदाधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
‘आयारामां’ना कधीपर्यंत पदे देणार?
‘महादेव जानकर यांना दुसऱ्या पक्षाचे असताना लोकसभेला बारामतीतून उभे केले. त्यांना रसद पुरविली; तसेच त्यांना आमदार केले. मंत्रीपद दिले. गोपीचंद पडळकर यांनाही आमदारकी दिली. बाहेरच्या जिल्ह्यांतील नेत्यांना जिल्ह्यात उभे करून त्यांना मोठे केले जाते. मात्र, जिल्ह्यात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना काहीच दिले जात नाही,’ अशा शब्दांत जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी असंतोष व्यक्त केला.