• Sat. Sep 21st, 2024
धैर्यशील माने यांनी पैरा फेडावा, नाहीतर आम्ही आमचं शेत नांगरू, सदाभाऊंचा कडक इशारा

भरत मोहोळकर, मुंबई : हातकणंगले मतदारसंघ हा आमचा घरचा मतदारसंघ आहे. गेल्यावेळी मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र आता मी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. धैर्यशील माने यांनी मागचा वेळचा आमचा पैरा फेडावा, नाहीतर आम्ही आमचं शेत नांगरू, असे विधान सदाभाऊ खोत यांनी करून माने यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

हातकणंगले मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत मी तयारी केली होती. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्या परिसरात काम करीत आहे. मंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मी विकासाचे मोठे काम केले आहे. रस्त्यांची कामं केली आहे. शेतरस्ते, पाणंद रस्ते, पन्हाळगडाच्या पाण्याचा प्रश्न, विशाळगडाच्या पाण्याचा प्रश्न मी सोडवला आहे. वाड्या-वस्त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. आरोग्याच्या प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे लोकांच्या प्रेमावर मी ती निवडणूक लढवणार आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
धैर्यशील माने, थांबता का बघा; सदाभाऊ खोत यांचं जाहीर आवाहन; बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचाही तुम्हालाच पाठिंबा

उसणा पैरा फेडायचा असतो

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत ती जागा शिवसेनेला सुटली. त्यामुळे त्या ठिकाणी मी धैर्यशील माने यांचं काम केलं. मात्र आता आम्हाला आमचं शेत नांगरावंच लागेल. त्यामुळे मी त्या मतदारसंघातून तयारी करीत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगून मानेंची धडधड वाढवली.

उसणा पैरा फेडायचा असतो. शेताभाताचं काम करताना एखाद्याचा पैरा असेल तर तो फेडावा लागतो, असं म्हणत यंदाच्या साली मला मदत करावीच लागेल, असं सदाभाऊ खोत यांनी मानेंना उद्देशून विधान केलं आहे. त्याचवेळी हातगणंगलेतून लढणारच अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
शरद पवारांना तुतारी चिन्ह मिळालं, त्यांनी तुतारी वाजवत स्मशानाकडे निघावं, सदाभाऊंची जीभ घसरली

वाघावर बसलेल्याने योग्य वेळी खाली नाही उतरलं तर वाघ त्याला खातो

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकत्र केलं. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं. पण त्यानंतरही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्यांची जात काढली. त्यामुळेच वाघावर बसलेल्याने योग्य वेळी खाली उतरलं नाही तर वाघ त्याला खातो, तशीच अवस्था मनोज जरांगे पाटील यांची झाली आहे, असे सूचक वक्तव्यही सदाभाऊ खोत यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed