• Sat. Sep 21st, 2024

मिळकतकराची झाडाझडती, १० वर्षांत पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या १६ हजार इमारतींची पुणे पालिका करणार पडताळणी

मिळकतकराची झाडाझडती, १० वर्षांत पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या १६ हजार इमारतींची पुणे पालिका करणार पडताळणी

पुणे : पुणे महापालिकेने गेल्या दहा वर्षांत १५ हजार ७८६ इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता या इमारतींमधील फ्लॅट, दुकाने, ऑफिसांची मिळकतकराची आकारणी झाली की नाही, ही तपासणी हाती घेण्यात आली आहे. आयुक्त विक्रमकुमार यांनी संबंधित अहवाल बांधकाम विभागाकडून मागवला असून, करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून मालमत्ताकराची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

आयुक्तांचा पडताळणीचा आदेश

महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात २४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळकतकरातून मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जानेवारीअखेरपर्यंत १९०० कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. उर्वरित ५०० कोटी रुपयांच्या उत्पन्नासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बांधकाम विभागाकडून गेल्या दहा वर्षांत पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या इमारतींची माहिती संकलित झाली आहे. या सर्व इमारतींना मिळकतकराची आकारणी झाली की नाही, याची पडता‌ळणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मालमत्ता करआकारणी नाहीच

पालिकेच्या बांधकाम विभागाकडून बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्याची माहिती करआकारणी आणि करसंकलन विभागाला देण्यात येते. त्यानुसार, कराची आकारणी करण्याची कार्यवाही विभागाने पार पाडणे अपेक्षित असते. अद्याप काही मालमत्तांची करआकारणी झाली नसल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आयुक्तांनी बांधकाम विभागाकडून सर्व माहिती संकलित केली असून, त्यानुसार करआकारणी झाली की नाही, याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आजपासून बँड वाजणार

पालिकेतर्फे कर थकबाकीदारांच्या घरासमोर बँडवादन केले जाणार आहे. आज, सोमवारपासून (२६ फेब्रुवारी) मोहीम हाती घेतली जाणार आहे. थकीत मिळकतकर वसुलीसाठी पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार हे बँडवादन केले जाईल. नामुष्की टाळण्यासाठी संबंधितांनी त्वरित करभरणा करावा, असे आवाहन उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

जप्ती होणार अन् पाणी तोडणार

करआकारणी आणि करसंकलन हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी विभागाला २,४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, आता आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. अजून ४४४ कोटी ८५ लाख रुपये जमा होणे बाकी आहे. त्यामुळे या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी करआकारणी व करसंकलन कार्यालयाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्षांच्या बैठका घेण्यात येत असून, मिळकतकर भरला नसल्यास संबंधितांचे पाणी तोडण्याचे प्रस्तावित आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुण्यातील लष्कर भागात पुन्हा होर्डिग, उत्पन्नवाढीसाठी ३१ अधिकृत होर्डिंग देण्याचा निर्णय
आर्थिक वर्ष २०२३-२४साठीचे उद्दिष्ट
~२,४०० कोटी

२४ फेब्रुवारीपर्यंत करसंकलन
~ १,९६७ कोटी

जप्त केलेल्या मिळकती
१९

वॉरंट
२८५
गेल्या दहा वर्षांत भोगवटा पत्र देण्यात आलेल्या इमारतींची मिळकतकराची आकारणी झाली की नाही याची पडताळणी करण्यात येत आहे. इमारतींची करआकारणी झाली नसल्यास ती करण्यात येईल. आतापर्यंत का झाली नाही, याची माहिती घेण्यात येईल.- विक्रमकुमार, महापालिका आयुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed