दरवर्षी यात्रेत शिवसैनिक महाप्रसादाचे वाटप करतात. यंदाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून गडाच्या पायथ्याशी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. ठाकरे गटाचे शिवसैनिक भाविकांना महाप्रसाद देताना ‘निष्ठेचा प्रसाद घ्या’ असे आवाहन करत होते. यामुळे याची चर्चा सर्वत्र रंगली होती.
अन्नदान करताना केलेल्या घोषणेची माहिती सायंकाळी पोलिसांना समजली आणि हिललाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. त्यानंतर उल्हासनगरचे शाखा प्रमुख सागर कांबळे व कल्याण पश्चिमचे शाखा प्रमुख केदार शेरे यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताच ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी श्री मलंगगडाच्या पायथ्याशी धाव घेतली होती. त्यांनी याप्रकरणी चौकशी केली मात्र प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे टाळले. पोलिसांच्या कारवाई नंतर ठाकरे गटाने अन्नदान करणे बंद केले होते.
याविषयी कल्याणचे ठाकरे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख शरद पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, आमच्या शाखा प्रमुखांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.उद्या त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.