‘या वेळी प्रत्येक स्टेशनवर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशात ‘अमृत भारत स्टेशन योजने’चा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे. या योजनेमध्ये पुणे रेल्वे विभागातील विकसित करण्यात येणाऱ्या स्थानकांमध्ये देहूरोड, चिंचवड, हडपसर, उरुळी, वाठार, लोणंद, सांगली, केडगाव, बारामती आणि कराड आदी स्थानकांचा समावेश आहे. ‘विभागातील विविध २५ ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज, रोड अंडर ब्रिज बांधण्याच्या कामांचे उद्घाटन होणार आहे. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत,’ असे दुबे यांनी सांगितले. या वेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील सहा स्थानकांचा समावेश
‘अमृत भारत स्टेशन योजने’मध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील सहा स्थानकांचा समावेश आहे. त्यामध्ये हडपसर टर्मिनल नव्याने उभारण्यात येत आहे. या ठिकाणी तीन इमारती उभारण्यात येत असून, त्यातील दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे भविष्यात पुणे स्टेशनबरोबर हडपसर स्टेशनवरून महत्त्वाच्या गाड्या सुटण्यास मदत होईल. उरुळी, केडगाव, बारामती, चिंचवड आणि देहूरोड या स्थानकांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, लोणंद आणि वाठार स्थानकाचा समावेश असून, सांगली स्थानकाचाही विकास होणार आहे.
विद्यार्थ्यांचा होणार गौरव
‘अमृत भारत स्टेशन’च्या पायाभरणीच्या निमित्ताने पहिली ते पाचवी आणि सहावी ते अकरावी अशा दोन गटांत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा विषय ‘२०४७मधील विकसित भारत आणि विकसित रेल्वे’ असा होता. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे.