• Mon. Nov 25th, 2024

    सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Feb 24, 2024
    सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे, दि.24 (जिमाका) : प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, आयोजित कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) म्हाडा सदनिका सोडत 2023-24 संगणकीय सोडत कार्यक्रमात ते बोलत होते. कोंकण विभागातील 5 हजार 311 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आयोजित केले होती.

    यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, अन्न, वस्त्र व निवारा ही काळाची व समाजाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी व ग्रामीण या दोन्ही भागात राबविली जाते. अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना या सदनिकांचे सोडतीद्वारे वाटप करण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्याला केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. राज्य शासनाकडून सर्वांसाठी मोठ्या प्रमाणावर घरे निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गिरणी कामगारांना देखील घरे देण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर देत आहे. हे सर्वसामान्यांचे शासन असून सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने चालले आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे.

    ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर असून आता अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात आणि राज्यात सर्वांगीण विकास होताना दिसतोय. शासनाकडून देण्यात येणारी ही सर्व घरे वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजेत. जे वेळेत घर पूर्ण करतील त्यांना सन्मानित करण्यात येईल, तर जे काम वेळेत पुर्ण करणार नाहीत त्यांना निश्चितच दंड आकारण्यात येईल.

    शेवटी म्हाडा सदनिका सोडत 2023-24 मध्ये ज्यांना घरे मिळाली आहेत त्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी म्हाडाचे अधिकारी-कर्मचारी, सोडतीमध्ये भाग घेतलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *