नाशिकरोड रेल्वे मालधक्का हा भाजीपाला, फळे, शासकीय धान्य, सिमेंट आणि रासायनिक खते आदी मालवाहतुकीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. आता त्यात वाहनांच्या वाहतुकीचीही भर पडली आहे. २०२२-२३ या वर्षात येथून २२७ रेकद्वारे २३,१९७ वाहनांची वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीतून रेल्वेला ३१ कोटी ९१ लाखांचा महसूल मिळाला. २०२३-२४ या वर्षात वाहनाच्या वाहतुकीचा आलेख आणखी उंचावला असून, त्यात जवळपास साडेतीन हजारांनी वाढ झाली. या वर्षात २५५ रेकद्वारे २६ हजार ६५१ कारची वाहतूक करण्यात आली असून, रेल्वेला ३५ कोटी ७० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. रेल्वेने वाहनांची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांत महिंद्रा कंपनीचा समावेश आहे. हरयाणा, पंजाब, राजस्थान, ओडिशा, आसाम, बिहार, झारखंड, हैदराबाद, बंगाल आदी ठिकाणी नाशिकमध्ये तयार झालेल्या कारची रेल्वेने वाहतूक होत आहे. नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथे इतरही मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने आता वाहनांच्या वाहतुकीसाठी जागा कमी पडू लागल्याने देवळाली कॅम्प येथून देशभरात रेल्वेद्वारे कार वाहतुकीला रेल्वे प्रशासनाकडून प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या रविवारी या रेल्वे स्टेशनवरून एक रेक रवाना झाला.
रोजगारनिर्मितीला चालना
नाशिकमधून रेल्वेमार्गे कारची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रोजगाराला चालना मिळाली आहे. याशिवाय रस्तेमार्गे वाहतुकीपेक्षा रेल्वेमार्गे कमी खर्चात आणि सुरक्षित वाहतूक होते. भविष्यात या वाहतुकीत आणखी वाढ होणार असल्याचा विश्वास मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभाग प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वर्ष- वाहनसंख्या- महसूल (कोटी रुपये)
२०२३-२४-२६६५१-३५.७०
२०२२-२३-२३१९७-३१.९१