• Mon. Nov 25th, 2024

    पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; १ मार्चपासून ‘ही’ सेवा होणार बंद, जाणून घ्या

    पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; १ मार्चपासून ‘ही’ सेवा होणार बंद, जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : महामेट्रोने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा एक मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पुन्हा एकदा थांबावे लागणार असल्यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार आहे. त्यामुळे ही सेवा बंद करू नये, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

    वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट असा मेट्रो मार्गाचा विस्तार केल्यानंतर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या होत्या. सकाळी व सायंकाळी मेट्रोला गर्दी असते. त्या वेळी प्रवाशांना रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करावे लागते; पण रिटर्न तिकीट सेवा असल्यामुळे परतीच्या प्रवासामध्ये प्रवाशांना तिकीट खिडकीवर थांबावे लागत नव्हते; तसेच तिकिटाच्या दरातदेखील बचत होत होती. त्यामुळे परतीचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. अलिकडे मेट्रोने परतीच्या तिकिटावर दिली जाणारी सवलत बंद केली असली तरी परतीचे तिकीट प्रवाशांच्या सोयीचे होते; पण काही तांत्रिक अडचणीमुळे मेट्रोने एक मार्चपासून परतीचे तिकीट काढण्याची सोय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा प्रवाशांना फटका बसणार आहे. त्यामुळे ही सेवा बंद न करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

    परतीच्या तिकिटासंदर्भात खूप तक्रारी येत होत्या. प्रवासी तिकीट काढल्यानंतर प्रवास करून शेवटच्या स्थानकातून बाहेर न पडताच परत प्रवास करीत होते; तसेच काही प्रवासी मध्येच एखाद्या मेट्रो स्थानकावर उतरून पुन्हा परत येत होते. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत होता. परतीचे तिकीट काढणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक (जनसंपर्क), महामेट्रो
    पुणेकरांसाठी गुड न्यूज! आता मेट्रोची सेवा रामवाडीपर्यंत, कधी होणार सुरु? जाणून घ्या
    परतीचे तिकीट सेवा बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना तिकीट काउंटरवर रांगेत उभे राहवे लागणार आहे. यामध्ये प्रवाशांचा वेळ जाणार आहे. त्यामुळे ही सेवा बंद करू नये.- सुदर्शन साठे, पिंपरी
    मेट्रोने परतीचे तिकीट सेवा बंद करू नये. या सेवेमुळे प्रवाशांना तिकीट काउंटरवर जावे लागत नव्हते. गर्दीच्या वेळी खूप फायदा होत होता. त्यामुळे वेळेत बचत होत होती. काही कारण नसताना ही सेवा बंद करणे चुकीचे आहे.- रोहित बडे, कर्वेनगर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed