• Sat. Sep 21st, 2024
अपघात विभागात नेताना लिफ्ट बंद पडली, आयसीयूमध्ये दाखल करण्याआधीच रुग्णाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) लिफ्टमध्ये गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) घडली. संबंधित रुग्णाला लिफ्टमधून अपघात विभागात नेत असताना लिफ्ट किमान १० ते १५ मिनिटे बंद पडली. आयसीयूमध्ये दाखल करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घाटीतील जुन्या तसेच नादुरुस्त लिफ्टचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आईस्क्रीम खाल्याने विषबाधा झाल्याचा आरोप; धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून बेकरीची तोडफोड
संबंधित ज्येष्ठ रुग्णाला बाह्य रुग्ण विभागाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या वार्धक्यशास्त्र विभागात उपचारासाठी आणण्यात आले होते. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीसह एकूणच रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णाला अपघात विभागात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्ट्रेचरवरुन रुग्णाला लिफ्टने अपघात विभागात नेत असतानाच ही लिफ्ट १० ते १५ मिनिटे बंद पडली. लिफ्टमध्ये रुग्णासह तीन ते चारजण अडकले. विद्युत विभागाच्या तंत्रज्ञांनी एकदाची लिफ्ट सुरू केली. दरम्यानच्या काळात रुग्णाला ‘सीपीआर’ देण्याचा प्रयत्न झाला. लिफ्ट सुरू होताच रुग्णाला अपघात विभागात आणि अपघात विभागातून अतिदक्षता विभागात हलवण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. वस्तुत: रुग्णाचा मृत्यू लिफ्टमध्येच झाला होता, असेही समजते.आजारी वृद्धांना जिने चढण्याची सक्ती
घाटीच्या बाह्य रुग्ण विभागाच्या इमारतीमध्ये वार्धक्यशास्त्र विभाग हा पहिल्या मजल्यावर आहे. साहजिकच साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ आणि वृद्धांना चक्क आजारपणातही उपचार घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर जावे लागते. पुन्हा एकच लिफ्ट असल्याने अनेकजण मोठ्या गर्दीमुळे शेवटी पायी जाण्याचा विचार करतात. त्यातच ही लिफ्ट अनेकदा बंद असते. तेव्हा तर नाईलाजाने आजारी वृद्धांना पायीच जावे लागते. अशी एकंदरीत स्थिती असताना निदान वार्धक्यशास्त्र, स्त्रीरोगशास्त्र यासारखे विभाग तरी तळमजल्यावर का असू नयेत, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकांवर धोकादायक परिणाम होणार नाही | पंकजा मुंडे

त्याचप्रमाणे मुळातच अत्यवस्थ रुग्णांना ‘ओपीडी’ऐवजी अपघात विभागात का दाखल केले जात नाही, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. संबंधित लिफ्ट २४ ते २५ वर्षे जुनी आहे. नवीन लिफ्ट खरेदीसाठी २३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. येत्या एका महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून खरेदी प्रक्रिया राबवून ही लिफ्ट बदलण्यात येईल, असं घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed