शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता भुसे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी येत्या आठवडाभरात टवाळखोरांना धडा शिकवून मुसक्या आवळण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गेल्या महिनाभरात गंभीर गुन्हे घडले, याची दखल घेत बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बछाव, जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोरस्ते यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्य सरकारची बदनामी होत असल्याचे सांगितले.
वाहनांची जाळपोळ, दगडफेकीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शहराला वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पालकमंत्री भुसेंकडे केली. त्यानंतर भुसेंनीही पोलिसांना तातडीने गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या. शहरातील ब्लॅकस्पॉट शोधून कोम्बिंग ऑपरेशन करून सराइत गुन्हेगार शोधून त्यांची कसून चौकशी करण्याची सूचना यावेळी केली. जे दोषी व उपद्रवी असतील, त्यांची धिंड काढण्याची सूचनाही त्यांनी यावेळी पोलिसांना दिली.
आठ दिवसांची मुदत
पालकमंत्री भुसे यांनी शहरात रस्त्यावर पोलिसांनी दिसायला हवे यासाठी पोलिसिंग वाढविण्याच्या सूचना केल्या. दामिनी पथक सक्रिय करून टवाळखोरांना धडा शिकवा, अवैध धंदे तातडीने बंद करा. मला शहरात शांतता हवी आहे. त्यासाठी सर्वतोपरी यंत्रणा राबविण्याच्या सूचना यावेळी भुसे यांनी केल्या. येत्या आठ दिवसांत कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचेही त्यांनी बजावले.