तब्बल १२ पेक्षा जास्त जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांचा आधारस्तंभ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विविध जटील प्रश्नांवर काम सुरू झाले आहे आणि त्याचाच भाग म्हणून संपूर्ण घाटी परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. पदवीस्तरीय तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातही विविध सुधारणांनी वेग घेतला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचे फिल्टर कार्यरत झाले आहेत व विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळणेही सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे औषधी-साहित्यात विविध सुधारणा पाहायला मिळत आहेत व कमीत कमी औषधे बाहेरुन आणण्याची वेळ येत आहे. आता त्यापुढील टप्प्यात घाटी रुग्णालयाची औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र व अस्थिरोगशास्त्र या सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या विभागांची ओपीडी आता दिवसातून दोन वेळा सुरू राहणार आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांची मोठी सोय होणार आहे. त्याचजोडीला ‘सीसीएल लॅब’च्या सर्व चाचण्यांपासून ते अहवाल देण्यापर्यंतचे कामकाज हे पूर्णपणे ओपीडी बिल्डिंगमध्ये होईल. परिणामी, एकाच दिवसात अधिकाधिक चाचण्या होऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाहेरगावचा रुग्ण आपल्या गावी परतू शकेल. यामुळेच अपघात विभागावरील ताण तसेच गर्दीदेखील कमी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कॉलेज कौन्सिलच्या बैठकीत दिवसातून दोनदा ओपीडीचा निर्णय घेण्यात आला व त्याची सोमवारपासून (२६ फेब्रुवारी) अंमलबजावणी होईल, असे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. अर्थात, दोनदा ओपीडीचा निर्णय यापूर्वी मोजक्या वेळी घेतला गेला; परंतु हा निर्णय काही दिवसांसाठीच टिकला. या पार्श्वभूमीवर आता तरी या निर्णयाची अंमलबजावणी नेहमीसाठी होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
रोजच औषधी-साहित्याचा आढावा
अलीकडे रुग्णालयात पथकप्रमुखांचा दिवसातून एकदाच राऊंड होत होता; परंतु आता किमान दोनवेळा होईल व सहयोगी प्राध्यापक दर्जाच्या पथकप्रमुखामार्फत होईल. तसेच रुग्णालयात असलेल्या तसेच नसलेल्या समस्त औषधी व वैद्यकीय साहित्याचा रोजच आढावा घेतला जाईल व त्याची जबाबदारी वेगवेगळ्या वरिष्ठ डॉक्टरांवर सोपावण्यात आली आहे. त्याचा एकत्रित अहवाल रोजच अधिष्ठातांना पाठवण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे औषधी-साहित्याच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता असावी म्हणून काही तज्ज्ञांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. सर्व प्रकारची औषधे तसेच साहित्य २४ तास रुग्णालयात उपलब्ध असावे, या हेतुने प्रयत्न केले जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
‘डीपीसी’तून ४० कोटींवर निधी
यंदा जिल्हा नियोजन मंडळाकडून घाटीला ४० कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. या निधीतून औषधी-साहित्याची खरेदी होत आहे. सध्या सहा महिने पुरेल एवढा औषधी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यापुढील काळात रुग्णांना औषधांची कमतरता जाणवणार नाही, असेही सांगण्यात आले.
शहागंजच्या रुग्णालयासाठी प्रस्ताव
घाटींतर्गत शहागंज येथे महिला व बाल रुग्णालय उभे करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला २३ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव देण्यात येत आहे. या अंतर्गत महिला व बालरुग्णांना विविध आधुनिक रुग्णसेवा देण्यात येतील. लवकरच हा निधीही मंजूर होईल, अशी आशा डॉ. सुक्रे यांनी व्यक्त केली.
चिठ्ठीमुक्त घाटीकडे वाटचाल सुरू झाली आहे व ९९ टक्के औषधी रुग्णांना उपलब्ध होत आहेत. इतरही सुधारणांसाठी विविध निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या मदतीमुळे घाटीला पहिल्यांदाच ४० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आणि याचा रुग्णसेवेला मोठा हातभार लागणार आहे.-डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी