मुंबई, दि, २२ : गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानात उभारण्यात आलेल्या महान देशभक्तांच्या शिल्पातून सर्वांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानाचे सुशोभीकरण आणि १८ शिल्पांचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकस उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार जे. पी. नड्डा, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मुंबई महानगर महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, शायना एन.सी., लोढा फाउंडेशन संस्थेच्या मंजू लोढा, रणजित सावरकर, भीमराव आंबेडकर उपस्थित होते.
कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, मुंबई महापालिकेसोबत करार करून ही जागा विकसित करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईलच, त्याचबरोबर लाखो लोकांचे प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्यानातील १८ शिल्पांमध्ये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, डॉ. नाना शंकर शेठ, डॉ. होमी भाभा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सावित्रीबाई फुले, बाबू गेनू, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न जमशेदजी टाटा, दादासाहेब फाळके, सेठ मोतीलाल शाह, बाळासाहेब ठाकरे, अशोक कुमार जैन, रामनाथ गोयंका, कुसुमाग्रज, धीरूभाई अंबानी, कोळी पुरुष यांची रेखीव शिल्पे साकारली आहेत.
खासदार श्री. नड्डा म्हणाले की, युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या महान व्यक्तींचे विचार आणि त्यांचा आदर्श प्रेरणा देतील.
०००
प्रवीण भुरके/विसंअ/