धरणाची एक मीटरने उंची वाढवा
मुळशी धरणाच्या टप्पा एकमध्ये धरणाची उंची सुमारे एक मीटरने वाढविण्यास टाटा कंपनीने तत्त्वतः होकार दिला. त्या संदर्भातील प्रस्ताव जलसंपदा विभाग टाटा कंपनीला देणार आहे. मुळशी धरणाची उंची वाढवल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या फुगवट्यामुळे काही जमीन पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. धरणाची उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली येणारी ८० टक्के जमीन ही टाटा कंपनीच्या मालकीची असून, उर्वरित २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी सरकार मदत करील. संबंधित शेतकऱ्यांना चांगला मोबादला द्यावा, अशी सूचनाही पवार यांनी टाटा कंपनीला केली. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा एक आणि दोनच्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी. टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने या कामांना प्राधान्य द्या, असेही आदेश पवार यांनी दिले. धरणाची एक मीटर उंची वाढल्यास उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी पुणे शहराला मिळण्याची शक्यता आहे.
जलशुद्धीकरणासाठी चार एकर जागा
मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर कामाबाबत टाटा पॉवर कंपनीने हरकत घेतल्याने काम थांबले होते. त्या कामांना वेग देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलसंपदा विभागास प्रस्ताव द्यावा. जलसंपदा विभागाने आवश्यक पाण्याचे आरक्षण जाहीर करून टाटा पॉवर कंपनीला लेखी कळवावे; तसेच पौड येथील पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी ‘पीएमआरडीए’ने एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पुरेशा क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी शेजारी असणाऱ्या आणखी चार एकर जागेची आवश्यकता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ‘पीएमआरडीए’ने ही जागा अधिग्रहण करून उपलब्ध करून घ्यावी, असा आदेश पवार यांनी दिला आहे.