पनवेल : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं नाव घेतलं की अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. १९९६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती.
कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल ११ लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज २१ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झालं. पंढरी फडके हे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे.