मुख्य सूत्रधार फय्याज अहमद रसूल शेख (वय ५२, रा. बी २०, स्वीट सहारा अपार्टमेंट, राखेआळी रोड, जी. जी. कॉलेज रोड, वसई, जि. पालघर), रमेश नरसिंह आयथा (वय ४२,रा. गणेश नगर, बस स्टँड, मौला अली, मलकजगिरी, हैदराबाद) अशी कोठडीतील संशयितांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. फयाज शेख याने फक्त दुसरी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. मात्र केमिकलच्या बाबतीत त्याला सर्वज्ञान आहे. एमडी ड्रग्ज तयार करण्यात फयाज शेख हा एका केमिकल इंजिनिअरला किंवा फार्मसी क्षेत्रातील उच्चशिक्षितांना देखील मागे टाकू शकतो, इतका प्रचंड अभ्यास ड्रग्जच्या बाबतीत फयाज शेख याने घेतला आहे.
ऑक्टोबर महिन्यात कारवाई झाली होती
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापूर पुणे महामार्गावरील देवडीपाटी (ता. मोहोळ) येथील हॉटेल श्री साईसमोर दोघांना अटक केले होते. दोन्ही संशयितांकडून सहा कोटी दोन लाखांचा ३ किलो १० ग्रॅमवजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संशयित हे चंद्रमौळी व चिंचोळी एमआयडीसीत ड्रग तयार करीत असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानुसार ते कारखाने पोलिसांनी सील केले होते.
पोलिसांची विविध पथके मुख्य सूत्रधाराचा शोध घेत होते
एमडी ड्रग्ज कारवाईत सोलापूर पोलिस विविध मार्गांनी मुख्य सूत्रधार फय्याज शेख याचा तपास करत होते. फयाज हा कर्नाटकातील कलबुर्गी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथील लुंबिनी ग्रँड हॉटेल परिसरात सापळा रचून त्याला पकडले. तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे १६ फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार रमेश आयथा याला हैदराबादेतून ताब्यात घेतले. दोघांनाही येथील विशेष न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
आजतागायत आठ कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा पोलिसांनी हस्तगत केला
सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माहिती देताना सांगितले, एमडी ड्रग्ज प्रकरणात आजतागायत ८ कोटी ८२ लाख ९९ हजार २०४ रुपयांचा एमडी ड्रग्ज सदृश साठा जप्त केला आहे. सदर प्रकरणात आतापर्यंत १२ संशयित आरोपींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व मोहोळ पोलिसांनी प्रयागराज- उत्तर प्रदेश रिवा मध्यप्रदेश, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कर्नाटक राज्यातील बिदर आणि कलबुर्गी, (गुहाहाटी आसाम) या ठिकाणी तपास केला. तेथून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
एमडी ड्रग्जमधील म्होरक्या, दुसरी पास फयाज शेखला बेड्या ठोकल्या
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माहिती देताना असेही सांगितले, फयाज रसूल शेख हा एमडी ड्रग प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे. २००८ पासून त्याने हा गोरख धंदा सुरू केला होता. फक्त दुसरी पर्यंतचे शिक्षण घेतलेला फयाज शेख हा तामिळनाडू, आंध्रप्रदेश, राजस्थान या भागात अस्तित्व लपवून राहत होता. फयाज शेखवर मोहोळ (सोलापूर)पोलीस स्टेशन, खार पोलीस स्टेशन (मुंबई), नाशिक रोड पोलीस स्टेशन, माणिकपूर पोलीस स्टेशन(पालघर), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई, मुरबाग अली पोलीस स्टेशन (कर्नाटक)ओंगल पोलीस स्टेशन (आंध्रप्रदेश), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चेन्नई, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हैदराबाद, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अहमदाबाद या ठिकाणी गुन्हे दाखल आहे.
मुख्य सूत्रधारास अटक करण्यात सोलापूर पोलिसांचा मुख्य वाटा
एमडी ड्रग्ज तयार करणारा, प्रत्येक केमिकल बाबतीत सर्वज्ञान ठेवणारा फक्त दुसरी पास फयाज शेखला ताब्यात घेण्यासाठी सोलापूर पोलिसांनी चार महिने तपास करावा लागला. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, फौजदार सुरज निंबाळकर, राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, हेडकॉन्स्टेबल सलीम बागवान, विजयकुमार भरले, नाईक दीपाली जाधव, कॉन्स्टेबल अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यश देवकते, सायबरचे अभिजित पेठे, व्यंकटेश मोरे, महादेव काकडे यांनी ही कारवाई केली.