• Sat. Sep 21st, 2024
कपिल पाटील जिंकणार की बाळ्या मामा बाजी मारणार? भिवंडीत काय होणार?

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा ठोकत आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी नुकतीच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. तर जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे मात्तबर उमेदवारही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. एएमआयएम, मनसे सुद्धा येथून आपला उमेदवार रिंगणात उतरवू शकते. एकंदर यावेळी भिवंडी लोकसभेत काँटे की टक्कर होऊ शकते.

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
रायगडची जागा राष्ट्रवादीला, तुमच्या मनातील उमेदवार मिळणार, अजित पवारांची जाहीर सभेत घोषणा, भाजपच्या गोटात खळबळ?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा. पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा भाजपचे दिवंगत नेते रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या जिल्ह्याला केंद्रात संधी मिळाली नाही. कालांतराने भाजपकडून शिवसेनेने ठाणे जिल्हा हिसकावून घेतला. अगोदर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे. मुंबईतील सेनेचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील सत्तेला आव्हान देण्याकरिता कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्री पदावर संधी देण्याचे धोरण भाजपचे असल्याचे बोलले जात आहे.
ना भाजप, ना राष्ट्रवादी; जळगाव लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीचे संकेत, उमेदवार कोण?

दरम्यान, ग्रामीण भागातील दिग्गज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत बाळ्या मामांनी राष्ट्रवादीचे नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात प्रवेश केला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस नंतर आता पुन्हा राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.
महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागावाटप का रखडलं? कोणत्या मतदारसंघांबाबत तिघांचं एकमत होणं बाकी?

सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्या मामा नावाने प्रसिद्ध आहेत. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं होतं. २०१४ मध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. पराभवानंतर आधी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली होती. त्यामुळे त्यांचं शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं. नंतर ते निलंबन मागे घेण्यात आले. आता मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगणार असल्याचे संकेत मिळत आहे.
इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभेला उतरण्याचे संकेत, भाजप खासदाराला फटका की काँग्रेसला झटका?

मनसे, एएमआयएम आणि समाजावादी पक्षाचे मतदार ठरणार महत्वाचे

भिवंडी लोकसभेत राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. जर मनसे पक्षाने उमेदवार दिला तर याचा फटका भाजपला बसू शकतो. भिवंडीत मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एएमआयएम पक्षाने उमेदवार दिला याचा फटका महाविकास आघाडी बसू शकतो. सध्यातरी समाजावादी पक्ष महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे समाजावादी पक्षाला मानणार मतदार हा महाविकास आघाडीच्या उमेदवारला मतदान करु शकतो.
शरद पवारांनी जिथे पाडलं, त्याच मतदारसंघातून लोकसभेवर जाण्यास उत्सुक; जानकरांनी दंड थोपटले

भिवंडी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा

१. शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत.
२. मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे आमदार आहेत.
३. भिवंडी पश्चिममधून भाजपचे महेश चौघुले आमदार आहेत.
४. भिवंडी पूर्वमधून समाजवादी रईस शेख आमदार आहेत.
५. भिवंडी ग्रामीणमधून शिंदेच्या शिवसेनेचे शांताराम मोरे आमदार आहेत.
६. कल्याण पश्चिम मधून शिंदेच्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे मधून विद्यमान आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed