• Mon. Nov 25th, 2024

    वातानुकूलित सुविधांच्या नावाने प्रवाशांची लूट, ‘शिवशाही’ बसचा प्रवाशांना मनस्ताप

    वातानुकूलित सुविधांच्या नावाने प्रवाशांची लूट, ‘शिवशाही’ बसचा प्रवाशांना मनस्ताप

    म. टा. वृत्तसेवा, अलिबाग: अलिबाग-पनवेल-अलिबाग या मार्गावरील विनावाहक, विनाथांबा वातानुकूलित शिवशाही एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र नेहमी अस्वच्छ असलेल्या या बसमध्ये एसीअभावी प्रवासी घामाघूम होत आहेत. वातानुकूलित बसच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू असून, याकडे एसटीचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.फलाटावर लावलेल्या शिवशाही बसचे इंजिन चालू ठेवले जाते, मात्र आतील एसी बंद असतो. यामुळे गाडीत गरम हवा तयार होते. गाडी सुरू झाल्यावरही अनेकदा एसी सुरू करण्यात येत नाही. अखेर चालकाला याची आठवण करून द्यावी लागले. त्यानंतर गाडीतील गरम हवा थंड होईपर्यंत निम्माअधिक प्रवास संपतो. त्यामुळे प्रवाशांचा संताप होतो. विशेष म्हणजे याबाबत तक्रारी करूनही पनवेल व अलिबाग डेपोमधील संबंधित चालकांना काहीच फरक पडत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
    उद्धव ठाकरेंचा शिलेदार मावळ मतदारसंघात कामाला लागला, शिंदेंच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्लॅन रेडी
    शिवशाही ही वातानुकूलित बस असल्याने एक फेरी झाल्यावर गाडीची आतून स्वच्छता करणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने धूळ बसमध्येच फिरत राहते व त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसमधील रीडिंग लॅम्प, चार्जिंग पॉइंट बंद असून, बाटली होल्डर आणि आसने मागे-पुढे होणारे गिअर नादुरुस्त आहेत. बसचालकाकडे तक्रार केली तर वादाचे प्रसंग उद्भवणाची भीती असते. अशाच एका वादातून काही महिन्यांपूर्वी चालक व प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती. या सर्व प्रकारामुळे प्रवासी या गाडीकडे पाठ फिरवण्याची शक्यता असून, याचा महामंडळाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

    रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्यातील पहिली धुळे ते अयोध्या एसटी रवाना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ठाण्यातील खोपट एसटी स्थानकाला भेट देऊन तेथील कर्मचारी रेस्ट रूम व स्वच्छतागृहाची पाहणी केली. त्यानंतर योग्य त्या सुविधा पुरवण्याचे आदेश वरिष्ठांना दिले. अशाचप्रकारे वातानुकूलित केबिनमध्ये बसून जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या रायगड व पनवेल विभागाच्या एसटी अधिकाऱ्यांनी बाहेर पडून शिवशाहीतील स्वच्छता व सुविधा पाहव्यात, तसेच पनवेल बस स्थानकातील स्वच्छतागृहांना अचानक भेट देऊन त्यांची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed