• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यातील बेशिस्त हॉटेल, पबचालकांना पोलिसी खाक्या; नियमभंग केल्यास थेट कारवाईचा इशारा

    पुण्यातील बेशिस्त हॉटेल, पबचालकांना पोलिसी खाक्या; नियमभंग केल्यास थेट कारवाईचा इशारा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील रेस्टॉरंट, बीअर बार, रुफटॉप हॉटेल आणि पबसाठी पुणे पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.

    फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ नुसार, आदेश जारी करण्यात आला आहे. चार मार्चपर्यंत ही नियमावली प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली असून, त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविल्या आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले. शहरात काही रेस्टॉरंट, बीअर बार, हॉटेल आणि पब मध्यरात्रीनंतरही सुरू राहतात. त्यांचा नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी नियमावली तयार केली आहे.

    नियमावलीत काय?

    – मध्यरात्रीनंतर रेस्टॉरंट, हॉटेल, पब सुरू आहेत का, याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार.
    – हॉटेल, पबचालकांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करू नये, रहिवाशांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी.
    – सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करताना पोलिसांची परवानगी घ्यावी.
    – रुफटॉप हॉटेलांमध्ये बेकायदा मद्यविक्री करणे गुन्हा आहे.

    नियमभंग करणारे हॉटेल, परमिट रूम आणि पबचालकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कारवाई होणार आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायाला परवानगी आहे. रात्री दहानंतर ध्वनिवर्धकांचा वापर केल्यास कारवाई केली जाणार आहे. हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास, त्याची कल्पना पोलिसांना देणे गरजेचे आहे.- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त
    नियम म्हणजे नियम! पुणे पोलिसांसाठीही आता हेल्मेटसक्ती, अन्यथा होणार कारवाई, आयुक्तांची तंबी
    पोलिसांच्या व्यावसायिकांना सूचना

    – ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलचालकांनी सीसीटीव्ही लावावेत.
    – हॉटेलच्या प्रवेश मार्गावर; तसेच बाहेर पडण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बंधनकारक.
    – सीसीटीव्ही चित्रीकरणातील फुटेज साठविण्यासाठी दोन ‘डीव्हीआर’ लावावेत.
    – पोलिसांनी एक डीव्हीआर यंत्र तपासणीसाठी नेल्यास दुसऱ्यात चित्रीकरण साठवावे.
    – हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी आवश्यक.
    – कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी घ्यावी.
    – हॉटेलमध्ये धूम्रपानासाठी वेगळी जागा (स्मोकिंग झोन) असावी.

    हुक्का, शिशाविक्रीवर बंदी
    हॉटेल, रेस्टॉरंट-बार आणि पबमध्ये सर्व हुक्का आणि शिशाविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हुक्काविक्री करताना आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed