शिवसेनेकडे विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघ आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील तीन मतदारसंघांचे समन्वयक जाहीर केले आहेत. यात रामटेकचे प्रकाश वाघ, बुलडाणाचे समन्वयक राहुल चव्हाण, यवतमाळ-वाशीमचे समन्वयक उद्धव कदम यांचा समावेश आहे. मात्र, अमरावतीचे समन्वयक अद्याप जाहीर न केल्याने या जागेबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था उद्भवली आहे.
समन्वयकांच्या नियुक्तीनंतर लगेच रामटेक येथे मेळावा होणार आहे. गडमंदिरात सकाळी ९ वाजता आरती झाल्यानंतर १० वाजतापासून मेळाव्याला प्रारंभ होईल. यात निवडणुकीबाबत मंत्र दिला जाणार आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघात विशाल बरबटे यांची तयारी सुरू असून मेळाव्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे.
महायुतीत रामटेक मतदारसंघ शिवसेनेकडे; तर, महाआघाडीत सेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसकडे आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा दावा कायम असताना भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तुमाने यांचे काम चांगले असल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे रामटेकमधील त्यांच्या उमेदवारीच्या हॅटट्रिकसाठी अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले. भाजपच्या एका गटाने अरविंद गजभिये यांच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. शहर सरचिटणीस संदीप गवई यांचेही नाव एका गटातून चर्चेत आले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
काँग्रेसचा आधीच दावा
काँग्रेसकडून युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी बऱ्याच आधी दावा केला. जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत माजी मंत्री सुनील केदार समर्थकांनी रश्मी बर्वे यांचे नाव समोर केले. गेल्या निवडणुकीत संधी मिळालेले किशोर गजभिये समर्थकांनी त्यांना उमेदवारी न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकावा यासाठी समर्थक सरसावले आहेत. त्यामुळे रामटेक मतदारसंघातील दावे-प्रतिदावे अखेरच्या टप्प्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.