• Sat. Sep 21st, 2024
Video : पवारांशी उभा संघर्ष, तीन पिढ्यांचा वाद, ठिणगी कुठे पडली?

पुणे : आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता आणि तो नंतर फिरवला. आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांनी केले. अजित पवारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं सांगून अंकिता पाटील यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकलाय.. अजित पवार महायुतीत आल्याने बारामती जिंकण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजपला दिलासा मिळालाय. एकीकडे सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातील भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतायत.. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांच्या पुढच्या पिढीने अजित पवारांना खुलं आव्हान दिलंय. पण पाटील विरूद्ध पवार वाद तिसऱ्या पिढीत का आलाय, या दोन मातब्बर घराण्यात वादाची ठिणगी कुठे पडली, त्याचीच ही स्टोरी….

कधीकाळी.. शरद पवारांनी अजित पवारांसाठी हर्षवर्धन पाटलांच्या चुलत्याला (काकांना) डावललं होतं. इथेच पाटील-पवार या वादाची ठिणगी पडली.

  • १९८९ ला शंकरराव पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले
  • १९९१ ला शंकरराव पाटलांचं तिकीट कापलं
  • शरद पवारांकडून पुतण्या अजित पवारांना उमेदवारी
  • १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव पाटलांनी पुतण्या हर्षवर्धन पाटलांना राजकारणात उतरवलं
  • काँग्रेसने उमेदवारी नाकारताच हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडून आले
  • अपक्ष निवडून आलेल्या हर्षवर्धन पाटलांनी महायुतीला पाठिंबा देत मंत्रिपद मिळवलं

जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, ऑफिसमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवून म्हणाले…

शंकरराव पाटलांनी खासदारकीला डावलल्याचा बदला पुतण्याला आमदार करून घेतला. पुढे हर्षवर्धन पाटील राज्याच्या राजकारणात झेपावले तरी पवार विरूद्ध पाटील संघर्ष कायम राहिला.
अजितदादांकडे उमेदवारी मागितली, भावना गवळींविरोधात दंड थोपटणाऱ्या मोहिनी नाईक कोण आहेत?

  • १९९९ आणि २००४ ला हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडून आले, काँग्रेसला पाठिंबा देऊन मंत्री झाले
  • २००९ ला हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी, पण राष्ट्रवादीकडून बंडखोरी करत दत्ता भरणेंनी आव्हान दिलं
  • २०१४ च्या लोकसभेला हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंमागे ताकद लावली
  • पण विधानसभेला मदत करण्याचा शब्द देऊनही अजित पवारांनी दत्ता भरणेंना हर्षवर्धन पाटलांविरोधात उतरवलं
  • २०१४ ला हर्षवर्धन पाटलांचा पराभव घडवून आणला
  • तरीही २०१९ च्या लोकसभेला हर्षवर्धन पाटलांची सुप्रिया सुळेंना मदत
  • मात्र, विधानसभेला मदत करण्याचं आश्वासन देऊनही आघाडीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडली नाही
  • परिणामी हर्षवर्धन पाटलांवर भाजपमध्ये जाऊन विधानसभा लढण्याची नामुष्की

२०१४ ची लोकसभा असो की २०१९ ची.. भाजपने सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी तगडी फिल्डींग लावली.. पण हर्षवर्धन पाटलांच्या मदतीमुळे सुप्रिया सुळेंच्या मताधिक्यात भर पडली.. मात्र, विधानसभेला मदत करण्याचं आश्वासन अजित पवारांनी पाळलं नसल्याचा दावा हर्षवर्धन पाटील करतात. शिवाय आघाडी काळात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांविरोधात वर्चस्वाचं राजकारण करून खच्चीकरण केल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील समर्थक करतात.. त्यामुळे बापाच्या पराभवाची सल लेक अंकिता पाटलांनी बोलून दाखवत अजित पवारांवर वार केला.. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता पुन्हा एकदा लोकसभेला अजित पवारांना मदत करतील, का प्रश्न निर्माण झालाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed