आधी हा सागरी सेतू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारण्यात येणार होता. महामंडळाने या सेतूचा मूळ खर्च ३२ हजार कोटी रुपये निश्चित केला होता. मात्र, महामंडळाच्याच व्यवहार्यता अहवालात प्रकल्पाचा खर्च तब्बल ६३ हजार कोटी रुपयांवर नेण्यात आला. त्यानंतर हा सेतू मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्याचे ठरले. प्राधिकरणाने गेल्या वर्षीच्या बैठकीत सेतू उभारणीसाठी ६३ हजार २४६ कोटी रुपये खर्चाला मंजुरीही दिली. मात्र, मूळ प्रकल्पाचा खर्च दुप्पट कसा झाला, यासाठी वाढलेल्या खर्चाचा समवर्ती संरचनात्मक अभ्यासही ‘एमएमआरडीए’ने सुरू केला होता. याखेरीज प्रकल्पाचे बाकी सर्व अभ्यास अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता या सेतूचा निव्वळ बांधकाम खर्च ५५ हजार ५०० कोटी रुपयेच असेल, असे समोर आले आहे. मात्र, एकूण खर्च ६३ हजार कोटी रुपयांहून अधिकच असेल.
याबाबत ‘एमएमआरडीए’च्या सूत्रांनी सांगितले की, ‘या प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव विश्लेषण, भूसंपादन, सामाजिक-आर्थिक अभ्यास, भूतांत्रिक तपास, समुद्राची खोली तपासणे, असे विविध अभ्यास जवळपास पूर्ण झाले असून, त्याद्वारेच नवीन खर्चाचा आकडा समोर आला आहे. ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी असे सर्व प्रकारचे अभ्यास करावे लागतात. ते अंतिम टप्प्यात असल्यानेच मार्च २०२४ अखेरपर्यंत ‘डीपीआर’ला मूर्त रूप दिले जाईल.’
चार समुद्री आंतरबदल, चार जमिनीवरील आंतरबदल, तीन बोगद्यांसह दोन टप्प्यांत या सेतूचे बांधकाम ‘एमएमआरडीए’ने निश्चित केले आहे. समुद्री किनारपट्टीपासून १ किलोमीटर दूर हा सेतू उभारला जाणार आहे. त्यामुळेच प्रत्यक्षात किनारपट्टीला या सेतूचा धोका नसेल.
सेतूचे दोन टप्पे असे (संपूर्ण खर्च ६३ हजार ४५० कोटी रु.)
टप्पा १ : एकूण अपेक्षित खर्च २५ हजार ५०० कोटी रु.
– वर्सोवा-उत्तर मुख्य समुद्री जोडणी
– वर्सोवा, चारकोप व उत्तन येथे आंतरबदल
– चारकोप ते उत्तन जोडरस्ता
टप्पा २ : एकूण अपेक्षित खर्च ३७ हजार ९५० कोटी रु.
– उत्तन-विरार मुख्य समुद्री जोडणी
– वसई व विरार येथे आंतरबदल
– उत्तन-मीरा भाईंदर, वसई व विरारसाठी जोडरस्ता
सेतूची तांत्रिक माहिती अशी
-जमिनीवरील आंतरबदल असे : चारकोप-बोरसपाडा, उत्तन-मॅक्सस मॉल, वसई-राष्ट्रीय महामार्ग ४८, विरार-दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग
– समुद्री आंतर-बदल असे : चारकोप, उत्तन, वसई व विरार
– सहा ठिकाणी उभारणी पाया (नेव्हीगेशन स्पॅन)
– जोडरस्त्यावरील बोगदे : उत्तन येथे ५२० मीटर व ६६० मीटर, विरार येथे ६४० मीटर