छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज, सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्य सरकारने याअनुषंगाने अनेक घोषणा केल्या आहेत. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अफझल खानाचा वध करण्याच्या प्रसंगाचा पुतळा बसविण्यात येणार असल्याची घोषणा नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य सरकारने केली होती.
गेल्यावर्षी जून महिन्यात या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मानस होता. मात्र अद्याप या पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्य सरकारला मुहूर्त मिळालेला नाही. साधारण सप्टेंबर महिन्यातच हा पुतळा बांधून तयार झाल्याची माहिती पर्यटन विभागातील सूत्रांकडून देण्यात आली. मात्र त्यानंतरही या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र जयंतीचा मुहूर्तही न साधल्याने आता अनावरणासाठी पर्यटन विभागाकडून नवी तारीख शोधण्यात येत आहे.
प्रतापगडावरील या पुतळ्यासाठी राज्य सरकारतर्फे ६ फेब्रुवारी २०२३ रोजी पाच कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. हा निधी वितरितही करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. या पुतळ्यासाठी प्रतापगड्याच्या पायथ्याशी जागा निश्चितही करण्यात आली होती. त्याचवेळी याठिकाणी लाइट अँड साऊंड शो उभारणी सुरू आहे.