• Mon. Nov 25th, 2024
    राज्यातील ‘एमएसएमईं’ना बळ; मोशीमध्ये २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘डिफेन्स एक्स्पो’चे आयोजन

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत संरक्षण दलांमधील यंत्रणा, शस्त्रास्त्रांची निर्मिती देशातच व्हावी, यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना महाराष्ट्रातील, विशेषत: पुण्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (एमएसएमई) बळ दिले आहे. ‘एमएसएमईं’च्या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी मोशी येथील ‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेंशन केंद्रा’त २४ ते २६ फेब्रुवारी कालावधीत ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या उद्योग मंत्रालयाकडून आयोजित या प्रदर्शनाचा घेतलेला आढावा…

    दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग

    प्रदर्शनामध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित सामग्री, यंत्रणांची; तसेच विविध सुटे भाग तयार करणाऱ्या दोनशेहून अधिक ‘एमएसएमई’ आणि कंपन्या सहभागी होणार आहेत. लष्कर, नौदल आणि वायू दलांमध्ये संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध यंत्रणा, सामग्रींचे स्टॉल प्रदर्शनात असतील. याशिवाय टाटा ग्रुप, अदानी एंटरप्रायजेस, भारत फोर्ज, एल अँड टी यांसारख्या देशातील मोठ्या कंपन्यांची संरक्षणविषक उत्पादने, रणगाडे, संरक्षण वाहने, दारूगोळा, विविध ग्रेनेडपासून रॉकेट लॉँचरपर्यंतची सर्व घातक शस्त्रे सादर होणार आहेत.

    क्षेपणास्त्रे अन् हेलिकॉप्टरही

    ‘एक्स्पो’मध्ये वायूदलाची भारतीय बनावटीची हेलिकॉप्टर आणि काही क्षेपणास्त्रेही पहायला मिळणार आहेत. या उपकरणांच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया या वेळी जाणून घेता येणार आहे. याशिवाय अत्याधुनिक स्वरूपाचे रणगाडे, तंत्रज्ञानाने युक्त असलेली वाहनेही या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

    ‘एक्स्पो’मध्ये नक्की काय?

    – ‘एमएसएमई’, प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज गुंतवणूकदारांची संवादसत्रे.
    – संरक्षण क्षेत्रातील नवीन ट्रेंड, संधी आणि आव्हाने यांवर तज्ञ, विचारवंत दृष्टिक्षेप टाकणार.
    – संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘एमएसएमई’ कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी कार्यशाळा.
    – संरक्षण क्षेत्रातील ‘एमएसएमईं’च्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी यांवर उहापोह.
    – संरक्षण क्षेत्रात ‘एमएसएमईं’ना व्यवसाय वाढीसाठी संभाव्य खरेदीदार, सहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधी.

    वीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

    ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे राज्यातील वीस हजारांहून अधिक विद्यार्थी तीन दिवस सहभागी होणार आहेत. संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीमध्ये महाविद्यालयीन वयापासूनच रूची वाढावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योग विभागातर्फे राज्यातील जवळपास सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात आला आहे.
    संरक्षण सामग्री खरेदीला हिरवा कंदील, लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी ८४,५६० कोटींच्या खर्चाला मंजुरी
    ‘डिफेन्स एक्स्पो’ एका दृष्टिक्षेपात
    सहभागी एमएसएमई, कंपन्या
    २००

    सहभागी शैक्षणिक औद्योगिक संस्था
    २०००

    सरकारी कंपन्या, ऑर्डिनन्स फॅक्टरी
    १५

    प्रदर्शनात सहभागी मोठे उद्योग
    २५

    एकूण स्टॉल
    ५००

    राज्यातील ‘एमएसएमईं’च्या संरक्षण उत्पादनातील अफाट क्षमतेचा उपयोग करण्यासाठी एक्स्पो हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक नवकल्पनांना संधी देऊन, आमची देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत होण्याचा प्रयत्न आहे.- उदय सामंत, उद्योगमंत्री
    ‘एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’द्वारे राज्यातील एमएसएमईंना सर्वसमावेशक मदत देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यामध्ये उद्योग जोडणी सुलभ करणे, तांत्रिक सहकार्य करणे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आदींचा समावेश आहे.- डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, उद्योग विभाग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed