• Mon. Nov 25th, 2024
    काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनीताई सातव यांचे निधन

    गजानन पाटील, हिंगोली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री रजनीताई सातव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. उपचारादरम्यान नांदेड येथील डॉ. काबदे हॉस्पिटल येथे त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या.

    माजी राज्यमंत्री रजनीताई सातव यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये एक वेळेस विधानसभा आणि एकदा विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय त्यांनी आरोग्य राज्यमंत्रीपद देखील भूषवलेले होते. काँग्रेसमध्ये प्रदेश संघटनेत त्यांनी अनेक वर्षे काम केले होते.

    काँग्रेस पक्षात ज्येष्ठ नेत्या म्हणून काम करत असताना त्यांनी आपले चिरंजीव दिवंगत राजीव सातव यांना संघटनेच्या कामात सक्रिय केलेले होते. त्याचबरोबर आता त्यांची सून आमदार प्रज्ञाताई सातव यादेखील काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. सातव घराणे मागील ४३ वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही सातव कुटुंबाला ओळखले जाते.

    रजनी सातव यांच्यावर सोमवारी दुपारी १२ वाजता कळमनुरीमधल्या विकास नगर येथे अंत्यसंस्कार होतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed