• Sat. Sep 21st, 2024

झोपेतच बायकोच्या मृत्यूचा बनाव, पोलिसांनी अंत्ययात्रा रोखली; ‘त्या’ एका फोनमुळे प्रकरणाचा उलगडा

झोपेतच बायकोच्या मृत्यूचा बनाव, पोलिसांनी अंत्ययात्रा रोखली; ‘त्या’ एका फोनमुळे प्रकरणाचा उलगडा

यवतमाळ : रात्री झोपेतच पत्नीचा मृत्यू झाला, अशी माहिती नातलगांसह शेजाऱ्या – पाजाऱ्यांना पतीने दिली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी सारेच नातलग, मित्र परिवार जमला. त्यातून गुरुवारी दुपारी २.३० वाजता अंत्ययात्रेचीही तयारी झाली. मात्र, तेवढ्यातच अनपेक्षित पोलीस धडकले. निनावी फोन आल्याने पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरु केला. त्यातून धक्कादायक तथ्य पुढे आले. सदर महिलेचा नैसर्गिक मृत्यू नव्हे तर पतीनेच गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

दीपाली महेश मिश्रा (वय २८) रा. जामनकरनगर, यवतमाळ असे मृत महिलेचं तर महेश जनार्दन मिश्रा (वय ३४) असे मारेकरी पतीचं नाव आहे. याबाबत रत्नकला शंकर तिवारी (वय ७२) रा. वारज, ता. दारव्हा यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मृतक महिला पती व दोन मुलांसह जामनकरनगरात भाड्याच्या घरात राहत होती. दरम्यान, बुधवारच्या रात्री मिश्रा कुटुंबीय झोपी गेली असताना गुरुवारी पती महेशने पत्नीचा झोपेत मूत्यू झाल्याचे शेजाऱ्या – पाजाऱ्यासह नातलगांना सांगितले. त्यामुळे अंत्यविधीसाठी सर्व नातलग गोळा झाले. मात्र, कुणीतरी पोलिसांना या घटनेबाबत शंका असल्याचा फोन केला.
मोदींच्या त्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंना आला होता घाम, कोल्हापूरच्या अधिवेशनात CM शिंदेंनी सांगितला तो किस्सा

पोलिसांनी अंत्ययात्रा रोखली…

पोलिसांनी जामकरनगराच्या दिशेने प्रयाण केले. बाजोरीयानगरापर्यंत ही अंत्ययात्रा पोहोचली होती. दरम्यान, अंत्ययात्रा रोखून पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविला होता. ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी तपासचक्रे फिरवून सदर महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर तपासात धक्कादायक बाब पुढे आली. तसेच संशयीत पतीची कसून चौकशी केली. मात्र, तो हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगत होता.

रात्री उशिरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दीपालीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. तसेच याबाबत तक्रारही दाखल झाली. त्यावरून पोलिसांनी पती महेशविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. अधिक तपास अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

मुलांवरील छत्र हरविले…

मृतक विवाहित महिला आणि मारेकरी महेशला दोन मुले आहेत. घरगुती बादातून महेशने पत्नी दीपालीचा गळा आवळून खून केला. त्यामुळे मुलांवरील मायेचे छत्र हरविले आहे. तसेच पत्नीच्या खून प्रकरणी महेशला पोलिसांनी अटक केली, त्यामुळे दोन्ही मुले उघड्यावर आली आहे. एकूणच या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed