• Mon. Nov 18th, 2024

    सर्वसामान्यांना वेळेत आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

    ByMH LIVE NEWS

    Feb 17, 2024
    सर्वसामान्यांना वेळेत आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्या – मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दि. १७ (जिमाका): सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. कोणतीही गरजू व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

    येवला उपजिल्हा रुग्णालय येथे क्रस्ना डायग्नोस्टिक यांच्या सी.टी.स्कॅन मशीनचे लोकार्पण मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. शैलजा कुप्पास्वामी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. संदीप सुर्यवंशी, क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या कार्यकारी व्यवस्थापक पल्लवी जैन, निर्मळ संचेती यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, आज लोकार्पण झालेल्या सुमारे साडेचार कोटींच्या सी. टी. स्कॅन मशीनमुळे अनेक दुर्धर आजारांचे निदान होण्यास मदत होणार आहे. अतिगंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यकता भासल्यास खासगी विशेषज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे ही श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

    या उपजिल्हा रुग्णालयात अतिशय उत्तम व आधुनिक पद्धतीचा अतिदक्षता विभाग असून नव्याने 20 खाटाचे ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यास देखील मान्यता मिळाली आहे. याचप्रमाणे या रुग्णालयात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी 15 कोटींच्या नवीन निवासस्थान इमारतीला मान्यता प्राप्त झाली आहे. या कामांना लवकरच सुरवात होणार आहे. या सर्व सुविधांसोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रुग्णालयाचे मुख्य गेट दुरुस्त करून घेऊन रुग्णालयाचा बाहेरील परिसर स्वच्छ ठेवून त्यामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे ही यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

    प्रारंभी मंत्री श्री. भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी केली. यावेळी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. शैलजा कुप्पास्वामी यांनी सांगितले, या सी.टी. स्कॅन मशीनचे काम हे क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्याकडे सात वर्षांसाठी देण्यात आले आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. तर बाहेरील रुग्णांसाठी माफक दरात सी. टी. स्कॅनची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    येवला उपजिल्हा रुग्णालयातील उपलब्ध सुविधा…..

    ➡ फेब्रुवारी २०२१ पासून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित.

    ➡सध्यस्थितीत २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिटसाठी प्रशासकीय मान्यता.

    ➡रुग्णालयाची संरक्षक भिंत, कॉक्रीट रस्ता, अग्निप्रतिबंधक उपाययोजना, सांडपाणी व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण इ. दीड कोटींच्या कामास देखील मान्यता.

    ➡आजपासून उपजिल्हा रुग्णालय येवला येथील सी.टी. स्कॅन सेंटर जलद गतीने सुरू

    ➡ उपजिल्हा रुग्णालयात २५ खाटांचे अत्याधुनिक अतिदक्षता विभाग व पीआयसीयू विभाग, रुग्णालयात क्ष-किरण, ईसीजी, प्रयोगशाळा, महालॅब, एनसीडी, सोनोग्राफी इ. सुविधा उपलब्ध

    ➡ रुग्णालयात अपघात विभाग, प्रसुति, अस्थीरोग, बालरोग विभाग, मेडिसिन विभागांसाठी स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed